सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कम्युनिटी पोलिसिंगमध्ये जिल्हा पोलिस दलाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. याबाबतचा पुरस्कार पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून स्वीकारला. या पुरस्कारामुळे जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक वाढला आहे.
समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि नागरिकांना पोलिस हा जवळचा मित्र वाटला पाहिजे, यासाठी केल्या जाणाऱ्या कार्याला कम्युनिटी पोलिसिंग म्हणून ओळखले जाते. पोलिस व नागरिकांचे संबंध चांगले असले की गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होते. बेस्ट कम्युनिटी पोलिसिंगसोबतच सीसीटीएनएस व विविध तंत्रज्ञानाचा पोलिसांच्या कामकाजातील वापरही महत्त्वाचा असतो. त्यातून गुन्हे उघडकीस येण्यास मदत होते. विविध तंत्रज्ञानाचा वापर व गुन्ह्यांचा छडा लावण्यामध्येही जिल्हा पोलिस दलाने चांगली कामगिरी बजावली होती.
डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत विविध स्तरावर पोलिस महासंचालकांकडून श्रेणी तयार करून त्याची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशी विभागणी केली गेली. या तीन स्तरांतून सर्वोत्कृष्ट पोलिस घटक निवडले गेले. सहा हजारांपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या ‘बी’ श्रेणीमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश होता. सातारा जिल्हा पोलिस दल आणि बीड जिल्हा पोलिस दलाला संयुक्तरीत्या ‘बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्ह’ने सन्मानित करण्यात आले आहे. सातारा पोलिसांनी आजी-माजी सैनिकांच्या नातेवाइकांच्या तक्रार निवारणाची शिबिरे, पोलिसांसाठी कोविड रुग्णालय, तसेच कोरोना केअर सेंटर, कोरोना कालावधीत पारधी समाजातील लोकांसाठी धान्यवाटप, निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले.
You must be logged in to post a comment.