सातारा : सातारा पालिकेच्या वतीने शहरात गेल्या दीड वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत हे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, खोदकामामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने खडीकरण व डांबरीकरण करणे क्रमप्राप्त होते. मात्र, भर पावसात खडीकरणाचे काम हाती घेतले. परंतु भुयारी गटार योजनेते काम निकृष्ठ दर्जाचे केलेल्यामुळे खडीकरणाचे काम सुरु असताना आज सातारा पालिकेच्या ट्रॅक्टरचे चाक भुयारी गटारासाठी खोदलेल्या गटात रुतले. त्यामुळे या योजनेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
भुयारी गटार ही सातारा पालिकेची महात्वाकांक्षी कामे आहेत. ग्रेड सेपरेटर सातारकांच्या सेवेत दाखल झाला असून, कास धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. या तुलनेत शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम मात्र, अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. शासनाकडून या योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांचा कामाचा वेग पाहता आतापर्यंत केवळ पन्नास टक्केच काम पूर्ण झाले आहे.
भुयारी गटार योजनेचा विषय आजवर नेहमीच चर्चेचा ठरला आहे. नागरिकांना कामाचा फायदा कमी अन् तोटाच अधिक होत असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला होता. या कामाच्या दर्जाबाबतही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या शहराच्या पश्चिमेकडील मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ परिसरात भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली. नागरिक तसेच वाहनधारकांना निर्माण होणाºया अडचणींची दखल घेत पालिकेने नुकतेच येथील खड्डे खडी टाकून मुजविले आहेत. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने आता डांबरीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कोटेश्वर मैदान परिसरातील भुयारी गटार योजनेसाठी काढलेल्या गटारच्या खड्ड्यावर खडीकरण करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खडीची वाहतूक करणार ट्रॅक्टरचे चाक खड्डयामध्ये रुतले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर ट्रक्टरचे चाक बाहेर काढण्यात आले. नगरपालिकेच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
You must be logged in to post a comment.