‘साविआच्या स्वच्छतेच्या गप्पा म्हणजे करून करून भागलं…’अमोल मोहिते यांचा टोला

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : घंटा गाडयांवरील गीतामुळे निर्माण झालेल्या सातारा नगरपालिकेच्या अस्तित्वापेक्षाही सातारा विकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या बजबजपूरीने बरबटलेल्या कारभाराचा गवगवा अधिक झाल्यानेच सातारा नगरपालिकेचे नाव सर्वदूर पोहचले आहे. कोविड प्रतिबंधीत लसीकरण कार्यक्रम अंमलबजावणीत काडीचे योगदान नसणारी सातारा विकास आघाडी ही निवडणूकीच्या तोंडावर केवळ पेपरबाजी करीत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली संपूर्ण नगरपालिकेच्या तिजोरीचाच सुफडासाफ करणा-या सातारा विकास आघाडीने स्वच्छतेच्या गप्पा मारणे म्हणजे करून करून भागले. असाच प्रकार असल्याचा टोला नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद व नगरसेवक अमोल मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेचं अस्तित्व आणि तिच्या कारभारावर टीकास्त्र सोडल्यानंतर त्याला उत्तर म्हणून सोमवारी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दीपत्रक काढून ‘सातारा पालिका आहे हे घंटागाडीमुळे कळते’ ही टीका स्वच्छ साताऱ्याची अप्रत्यक्ष कबुलीच अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर म्हणून नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक अमोल मोहिते यांनी आज मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या प्रतिक्रियेवर टोला लगावला आहे.

साता-यात आता हंडे मोर्चे का निघत नाहीत याची पार्श्वभूमी जाणून घेवून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे सातारा शहराला नवसंजीवनी ठरलेली शहापूर पाणी पुरवठा योजना आकाराला आली ही योजना खर्चीक असल्याची ओरड तुमच्या नेत्यांनी केली होती. या योजनेमुळेच सातारकरांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. हे मात्र तुम्ही सोईस्कररित्या विसरलात. नंतरच्या काळात आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शासन पातळीवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नामुळेच कास धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लागला. कासच्या उंची वाढ प्रस्तावास मंजूरी मिळवून देण्याबरोबरच त्यानंतर रखडलेल्या कामांना निधी मिळवून देण्याचे कामही आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळेच झाल्याने सातारकर नागरीकांच्यावर हंडे मोर्चे काढण्याची वेळ आली नाही.   

खोटं आणि ते ही रेटून बोलण्यात माहीर असलेलेच सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या काळात विलगीकरण केंद्र व लसीकरणाच्या कार्यकमाबाबतीत कसलेच योगदान नसताना जनतेची दिशाभूल करीत आहेत. विलगीकरण केंद्रासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी काम करीत आहेत. तर लसीकरण मोहीम राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबवित आहे. असे असतानाही आम्हीच सर्वकाही करतो अशा फुशारक्या मारणा-या व सातारा विकास आघाडीच्या मार्गदर्शनाखालील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशकाबरोबरच कोविड बाधित मयतांच्या अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत रवण्यात आलेल्या सरणाच्या लाकडात किती मलीदा लाटला हे प्रसिध्दी माध्यमांनीच जगजाहीर केले आहे. एकदाची त्या जतूनाशकाची तपासणी करा म्हणजे कुणाकुणाच्या पोटात मलिद्याचे कीडे शिरलेत हे ही जनते समोर येईल.

नगरपालिकेत मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी चार-चार वेळा निविदा काढून केलेला निविदा कामातील भ्रष्टाचार तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासह सातारा विकास आघाडीतील कोणाकोणाला किती टक्केवारी द्यावी लागते हे तुमचेच नगरसेवक वर्तमानपत्रातून जाहीररित्या आरोप करीत असतात. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आघाडीवर असलेली सातारा विकास आघाडी असाच लौकिक तुम्ही मिळवला आहे. कोटयावधीच्या विकास कामांच्या बाथा मारणा-यांनी हद्दवाढीत नव्याने समावेश झालेल्या भागासाठी किती निधी आणला हेही जाहीर करावे. भुयारी गटर योजनेतला बट्ट्याबोळ, सोनगाव डेपोची दुरावस्था, घटांगाडीतला घपला आणि घंटागाडीवाल्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सफाई कामगारांचे चार चार महिने रखडणारे पगार, प्रकाश योजने खालील बजेटचा भ्रष्टाचार, खुलेआम सुरू असलेले कमीशनराज आणि स्वच्छतेच्या नावाखाली नगरपालिकेच्याच तिजोरीची सुरू असलेली सफाई यातच गुरफटून सक्षमतेचा डांगोरा पिटणा-यांनी विकासकामांच्या आणि नगरपालिकेच्या सक्षमतेच्या वल्गना करू नये.असे शेवटी अमोल मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!