सातारा जिल्हा बँकेचा अमित शहा यांचे हस्ते गौरव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि NAFSCOB यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल’ केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री. अमित शहा यांचे शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. श्री. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करन्यातत आला.

केंद्रीय सहकार मंत्रालय हे भारत सरकारच्या अंतर्गत मंत्रालय असून ६ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रीय सहकार मंत्रालयाचा देशातील सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक फ्रेमवर्क प्रदान करणे तसेच सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करण्याचा उद्देश आहे. तळागाळातील सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी, सहकारी संस्थांसाठी ‘व्यवसाय सुलभ करण्यासाठी’ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि बहु-राज्यीय सहकारी संस्थांचा विकास सक्षम करण्यासाठी कार्य करते. याचे नेतृत्व केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. श्री. अमित शाह करीत आहेत.

याप्रसंगी श्री. अमित शाह म्हणाले, सहकार मंत्रालय बळकट करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि स्पर्धात्मक सहकारी संस्था निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलण्यासाठी सहकार मंत्रालय सतत काम करेल. सातारा जिल्हा बँक जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे. बँकेचे कामकाज देशात आदर्शवत असून सहकार बळकट करणेसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे . नाबार्डकडून सलग सहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार आणि जिल्ह्यातील कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने सर्वांगीण कामकाजाची दखल घेवून बेस्ट बँक परफॉरमन्स म्हणून ‘विशेष स्मुती पुरस्कार २०२१’ ने बँकेस सन्मानित केले. बँकेच्या या सततच्या कामगिरीवर केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुरस्कार दिलेची बँक आणि जिल्हावासियांसाठी गौरवाची बाब आहे.

error: Content is protected !!