सातारा जिल्हा परिषदेला पं. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियानात सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्हा परिषदेने पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेला ५० लाख रूपयांचे पारितोषिक मिळणार आहे, तर या अभियानात देगाव (ता. वाई) व मान्याचीवाडी (ता. पाटण) या दोन ग्रामपंचायतींनाही राज्यस्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायत यादीत स्थान मिळाले असून त्यांना प्रत्येकी आठ लाख रूपयांचा स्वतंत्र पुरस्कार मिळाला आहे. केंद्रातर्फे जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार एकंदरीत जिल्हा परिषदांचे कार्य पाहता अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातील एक जिल्हा परिषद, दोन तालुके आणि १४ गावांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय क्षेत्रीय तपासणी समितीमार्फत याबाबत जिल्हा परिषदेत तपासणी करण्यात आलेली होती.

दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियानाची माहिती जिल्हा परिषदेने ऑनलाइन भरली होती. यानंतर त्याची राज्यस्तरीय क्षेत्रिय तपासणी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेची समिती नियुक्त केली होती. त्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी महेंद्र देशमुख सहायक प्रशासन अधिकारी नितीन दीक्षित, कनिष्ठ प्रशासन अधिकार सुधाकर कांबळे यांनी सहकार्य केले होते. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती मानसिंगराव जगदाळे, सभापती मंगेश धुमाळ, सोनाली पोळ, कल्पना खाडे यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचे देखील अभिनंदन केले.

सातारा जिल्हा परिषदेला सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेसाठी हा सर्वोच्च बहुमान असून हे यश केवळ अधिकारी कर्मचारी यांचे नसून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना तसेच ग्रामपंचायतींना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांचे देखील आहे.जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग मनापासून कार्य करीत असून, विविध योजना आणि कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत असा प्रयत्न असतो.

error: Content is protected !!