वाहतुकीबाबत सातारकरांसाठी ‘ये रे माझ्या मागल्या’

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याची वाहतूक व्यवस्था हा अनेक वर्षांपासून न सुटलेला प्रश्न आहे. याची विविध कारणे सर्वजणांना माहीत असली तरी त्यावर उपाययोजना आणि अंमलबजावणी होणे अत्यंत अवघड जाते असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

सातारा शहराची भौगोलिक रचना पाहिली तर पोवई नाका ते राजवाडा हा टप्पा महत्त्वाचा ठरतो .यामध्ये असणारी दुकाने ,बाजार ,व्यापारी पेठा, शाळा ,महाविद्यालय आणि त्यामुळे निर्माण होणारी गर्दी हा विषय नेहमीच ऐरणीवर आलेला आहे. पोवई नाक्याबाहेर गाव वाढत आहे. शासकीय कार्यालये, न्यायालय गावाबाहेर आहे .मात्र पोवई नाका किंवा राजवाड्या पर्यंत दिवसभरात चक्कर मारली गेली नाही असा एकही दिवस सातारकरांच्या आयुष्यात येत नाही. साहजिकच त्यामुळे रस्त्यांवर काही काळ गर्दी पाहायला मिळते. गर्दीच्या वेळेची तपासणी केली तर सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी पाच ते आठ साडेआठ वाजेपर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. सहाजिकच या काळात वाहतुकीला शिस्त लावली तर वनवे टू वे किंवा अनाकलनीय वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे हा भाग राहणार नाही . साताऱ्याच्या वाहतुकी संदर्भात ग्रेड सेपरेटर नावाचा प्रकार सुरू झाला आहे. या ग्रेड सेपरेटर मधून किती वाहने येतात जातात आणि त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली आहे का याचाही कोणताही अभिनवेश मनात न आणता विचार करणे महत्त्वाचे ठरते. सहाजिकच वाहतुकीची कोंडी अथवा वाहनांना रस्ते अपुरे पडण्याचे कारण नक्की काय आहे याचा विचार करणे आवश्यक आहे .

प्रशांत बुरडे जिल्हा पोलीस अधीक्षक असल्यापासून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने विविध प्रयोग करून पाहिले आहेत. वरच्या मार्गाने राजवाड्याकडे जायचे व खालच्या रस्त्याने पोवई नाक्याकडे जायचे असा वनवे करण्याचा अभिनव प्रयोगही साताऱ्यात करण्यात आला. एसटी स्टँड ते राधिका थिएटर आणि पोवई नाका ते समर्थ मंदिर हे अनेक दोन रस्ते सातारा वाहतुकीसाठी वापरले जातात. अर्थात याचा उपयोग सातारकरांसाठी कसा करून घ्यायचा हे एक आव्हान आहे. एकूण हे चार मार्ग गावातून जाणारे तर एसटी स्टँड पासून मोळाच्या ओढ्यापर्यंत गावाला वळसा घालून जाणारा मार्ग आणि मुळाच्या ओढ्यापासून राजवाडा पर्यंत जाणारा शाहूपुरी ,माजगावकर झोपडपट्टी, आर्यांग कॉलेज पासून बुधवार नाक्यापर्यंतचा मार्ग महत्त्वाचा आहे. सहाजिकच या सर्व मार्गांचे व्यवस्थापन करणे यापुढील काळाची गरज असेल.

याशिवाय शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली, कोडोली,संगमनगर ,वाढेफाटा, संभाजीनगर या ठिकाणी नव्याने होणाऱ्या वसाहती, महाविद्यालय, शाळा यांच्या संदर्भातही वाहतुकीच्या दृष्टिकोन विचारात घेऊन आत्तापासूनच लक्ष घातले पाहिजे .उदाहरणादाखल शाहूनगर गोडोली येथे सुरू झालेल्या शाळा आणि दिवसेंदिवस वाहनांची वाढती वर्दळ याचा विचार पोलीस व वाहतूक खात्याने केला पाहिजे. गर्दी वाढू लागली की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. काही दिवसानंतर या समस्यांना पोलीस खात्याला तोंड द्यावे लागणार आहे हे नक्की. तर मूळ मुद्दा आहे तो सातारा शहरात होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचा यासाठी खालचा रस्ता आणि वरचा रस्ता हे दोन रस्ते विचारात घेतले तर सणासुदीला रस्त्यावर येणाऱ्या दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या पाहता रस्ता रुंदीकरण करणे आता अशक्य आणि अवघड झाले आहे.मात्र रस्ता अरुंद होण्याची कारणे मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमणं, हॉकर्स झोनचा वापर आणि त्यावर अंमलबजावणी न करणे पोलिसांना वाहतूक नियंत्रणापेक्षा दंडात्मक कारवाई म्हणून पावत्या फाडण्याचे काम करायला लावणे ,बेशिस्त युवकांची दुचाकीवरून नवलाईची स्वारी अशा विविध कारणांकडे पाहता येईल. तसेच दिवसेंदिवस लयाला गेलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा सुद्धा अत्यंत गंभीर विषय आहे. पूर्वी मंगळवार तळ्यापासून संगम नगर पर्यंत तसेच एसटी स्टँड पासून शाहू नगर पर्यंत बसेस होत्या. रेल्वे स्थानकापर्यंत ही बसेसची नियमित वाहतूक होती. मात्र आता या सार्वजनिक बसेसची वाहतूक बंद झाल्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी ही वाढलेली पाहायला मिळते. यावरही प्रशासनाने, एसटी महामंडळाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण हा अत्यंत गंभीर विषय आहे.विशेषतः मोती चौकापासून खालच्या रस्त्याने येऊ लागलो की दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेल्या वस्तू आणि हॉकर्सने कब्जा केलेल्या जागा यामुळे दुचाकी स्वारालाही वाहतूक करणे अवघड जाते. पंचमुखी मंदिर ते मोती चौक किंवा मंडईकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ह्या परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था आहे. मोती चौक ते राधिका रोड यावरची परिस्थिती फारशी वेगळी नाही.मात्र वाहनांचे आणि अतिक्रमणांचे नियोजन केले तर वाहतुकीसाठी दुचाकी स्वरांना कसरत करावी लागणार नाही. हाच प्रकार पार्किंग च्या अनुषंगाने शहरातील लहान रस्त्यांवर पाहायला मिळतो. महिनोन महिने न हलणाऱ्या गाड्या रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेल्या आढळतात. साहजिकच रस्ते अरुंद होत आहेत. चार चाकी वाहने रस्त्यावर जवळजवळ बेवारस स्थितीत असल्यासारखी उभी करून ठेवल्यामुळे वाहतुकीला अडचण होते .वाहतूक शाखेने अशा पार्किंग केलेल्या गाड्या टो करून मैदानात ठेवाव्या व गाडीच्या मालकाकडून भाडे वसूल करावे. यामुळे कोठेही पार्किंग करण्याची बेशिस्त संपुष्टात येईल.

अनेक अपार्टमेंट्स मध्ये पार्किंगसाठी जागा नाहीत. त्या जागा कमर्शियल वापरासाठी विकण्यात आल्या आहेत. त्यामुळे पार्किंग मधील रहिवासी वा त्यातील दुकानदारांच्या गाड्या ,ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर येऊन थांबतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. यावरही ऑपरेशन होणे गरजेचे आहे. भाग निरीक्षक अशा प्रकारच्या वास्तू उभ्या राहीपर्यंत काय करत असतात आणि नंतर त्या जागांचा दंड भरून त्या जागा नियमित करून घेण्याचा डाव यापुढे उध्वस्त केला तर भविष्यात वाहतुकीच्या मार्गात अडथळे निर्माण होणार नाहीत.

पोवई नाका ते बस स्थानक या परिसरात मंडई तहसीलदार कार्यालय ,पेट्रोल पंप व व्यापारी गाळे आहेत .यातच भर म्हणून हॉकर्सची दुकाने सुद्धा चक्क फूटपाथवर आहेत आणि हा चक्रव्यूह भेदने आता वाद विचारांना अशक्य आणि अवघड झाले आहे. ग्रेड सेपरेटर मधून येणारी वाहने, रस्त्यावरून येजा करणारी वाहने, दुचाकी आणि त्यातून मंडईतून कचेरीत सर्वसामान्य नागरिकांना व वयोवृद्ध नागरिकांना जायचे असेल तर अक्षरशः दिव्य होत आहे. शाळा, महाविद्यालय यातील विद्यार्थ्यांना चालणे मुश्किल होत आहे.

ग्रेड सेपरेटर निर्माण करणाऱ्या महान अभियंत्याला २१ तोफांची सलामी याकरता दिली पाहिजे की, पादचाऱ्यांना जाण्यासाठी फुटपाची व्यवस्था सुद्धा या महान अभियंत्याने केलेली नाही. रात्रीच्या वेळी जी मंडळी चालत रस्त्यावरून जात असतात त्यांना या ग्रेड सेपरेटर च्या शेजारी एखाद्या वाहनाने उडवले तर त्याची दाद फिर्याद सुद्धा कोणी घेणार नाही. कारण सुरक्षित चालण्यासाठी येथे व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. अशा चुकीच्या बांधकामाला परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सत्कार केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरून गर्दीच्या वेळी तसेच रात्री १० नंतर एकदा चालत गेले पाहिजे. म्हणजे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालणे म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात येईल.

एकूणच वाहतुकीबाबत असणारी अनास्था, रिक्षाचालकांनी सुरू केलेली लुटालुट, पादचाऱ्यांना नसलेले वाली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी एकेरी वाहतुकीचा उभारलेला बडगा या सगळ्याचा विचार कधीतरी केला पाहिजे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बस जाण्यासाठी प्रशासकीय इमारतीच्या बाजूने बाहेर जाण्यासाठीचे द्वार निर्माण करण्याचे आदेश दिल्याचे ही समजते. अर्थात ही योजना पूर्वीच व्हायला पाहिजे होती. मात्र देर से आये लेकिन दुरुस्त आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. खरे तर पुण्यावरून साताऱ्यास येणाऱ्या प्रवाशांची थेट सांगली कोल्हापूर मिरज येथे जाणाऱ्या बसेसनी कुचंबणा केली आहे. आणि एका अर्थाने सातारकरांवर उपकार केले आहेत. हे म्हणण्याचे कारण त्या गाड्या महामार्गावरून परस्पर जात असतात त्या गाड्या जर सातारा बस स्थानकात आल्या तर वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व मेळावाच पाहायला मिळेल. एकूणच तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिस, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक नेटकेपणाने करण्याची आवश्यकता आहे.

एकेरी वाहतुकीने हे प्रश्न सुटणार नाहीत. अतिक्रमणांचे विषय तातडीने हातात घेतले पाहिजेत. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नये, याचाही विचार केला पाहिजे .अन्यथा विश्वास नांगरे पाटलांनी अतिक्रमण काढण्याच्या केलेल्या घोषणेनंतर राजकीय हस्तक्षेपामुळे ती अतिक्रमणे तशीच राहिली. या प्रकारे जर वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होणार असतील तर सातारकरांच्या नशिबी वाहतूक व्यवस्थेबाबत येरे माझ्या मागल्या याशिवाय दुसरे काहीच हाती लागणार नाही.

नियम करताय,मात्र सुविधांचे काय ?

सातारा शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सातारा पोलिस दलाने ठोस पावले उचचली आहेत. हे करतांना मात्र नागरीकांना सुविधा देण्याचा विचार न करता थेट नियमांचा आदेश काढण्यात आला.वास्तविक सातारा शहरात ठिकठिकाणी पार्किंग सुविधा देणे गरजेचे आहे. शाळांच्या परिसरामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविल्यास वाहतूक सुरळीत होणार आहे . त्यासाठी काय करता येईल हे तज्ञ टीम नेमून त्यानंतर आदेश निर्गमित करावेत.नियम करण्याची घाई करण्यापूर्वी सुविधा देण्याच्या दृष्टीने नगरपालिका, वाहतूक शाखा पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा दररोज बदलणारे नियम करून नागरिकांना व वाहनचालकांना वेठीस धरण्यात काहीच अर्थ नाही.

error: Content is protected !!