सातारकरांनो घाबरू नका; चाचण्या वाढल्याने रुग्णांत वाढ


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काहीएक कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे
.

जिल्ह्यातील कोरोनाविषयक सद्यस्थितीची माहिती देताना सिंह बोलत होते. ते म्हणाले,’ जिल्ह्यात पूर्वी दरदिवशी 350-375 कोरोना चाचण्या घेतल्या जात होत्या. आता मात्र चाचण्यांचे प्रमाण दुपटीने वाढवण्यात आले आहे. दिवसाला 650-700 चाचण्या घेतल्या जात असून त्यात नजीकच्या काळात आणखी वाढ होणार आहे. शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अँटिजेन किटद्वारे पुढील दहा दिवसांत जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवण्यात आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे सातारकरांनी अजिबात घाबरून जाऊ नये.
वैद्यकीय तपासणी करून घेणार्‍यांपैकी 40 ते 50 टक्के जणांना कोणत्याही प्रकारचे लक्षण नसल्याचे आढळून येत असून 20 ते 30 टक्के जणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. 10 ते 15 टक्के जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत असून 4 ते 5 टक्के जणांना अति दक्षता विभागात ठेवावे लागत आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर(3.3%) हा राज्याच्या मृत्यू दराच्या (3.7%) तुलनेत कमी असला तरी हा मृत्यू दर शून्य टक्क्यावर कसा आणता येईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

कोरोना रोखण्यास वापरल्या जाणार्‍या त्रिसूत्रीचा पुनरुच्चार
घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आणि हातांची स्वच्छता राखणे या कोरोना रोखण्यास वापरल्या जाणार्‍या त्रिसूत्रीचा जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू
कोरोनाच्या भीतीपोटी वैद्यकीय तपासणी करण्यास हॉस्पिटलमध्ये गेलेल्या नागरिकांनी त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण आढळून आले नसतानाही विनाकारण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा हट्ट धरू नये. अशाने आपण ज्या रुग्णांना खरोखरच बेडची गरज आहे त्यांना त्यापासून वंचित ठेवत आहोत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे यापुढे ’ए-सीम्टोमॅटिक’ (कोणतेही लक्षण नसलेला) रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा परिस्थितीतही जर कुणी बेड अडवण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

सातार्‍यात लवकरच आरटीपीसीआर लॅब
अनुमानित रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो पुण्यात पाठवून त्याचा चाचणी अहवाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते मात्र आता लवकरच ही चाचणी करणारी आरटीपीसीआर लॅब आपल्या जिल्ह्यातही सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अहवाल हाती उपलब्ध होऊन संबंधित रुग्णांवर वेळेत उपचार होऊ शकणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.
error: Content is protected !!