शिवाजीराजेंचे कार्य पुढे नेण्याचा सातारकरांचा निर्धार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वशंज , सातार्‍याच्या समाजकारणातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व,सातारचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष, राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य  श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारा राजा आपल्यातून निघून गेला आहे. यानंतर असा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजीराजांचे अजिंक्यतारा जिर्णोध्दाराचे स्वप्न  पुर्णत्वाला नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांना श्रध्दांजली वाहिली.

श्री.छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या सभागृहात सातारकरांच्यावतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या सुरूवातीला श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष़्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आ.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले,  शिवाजीराजे भोसले यांच्याबद्दलच्या आठवणी सर्वांनी  व्यक्त केल्या.अनेकांचे  वाटचालीत त्यांचे योगदान राहिले आहे. अदालतवाडा येथील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत ते पुढे म्हणाले, आजही काकांची 1439 ही अम्बेसिटर आहे तशी आहे.सर्वाबरोबर काकांच्या आठवणी जडल्या आहेत. काकांच्या जाण्याने  सर्वांना मोठा धक्का बसला आहे. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोणतीही  शारीरीक तक्रार नव्हती. डेंगू हे हॉस्पिटलला जाण्याचे निमित्त झाले आणि त्यातच ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमचा राजघराण्याचा आधार हिरावला गेला आहे.सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काही मोजक्याच जणांची नावे लक्षात राहतात त्यात प्रतापसिंह महाराज त्यानंतर शिवाजीराजे भोसले यांचे नाव आहे. त्या पदाला त्यांनी न्याय दिला आहे. काकांच्या नेतृत्वाने त्या पदाची उंची वाढली ही वस्तूस्थिती आहे.

वृषालीराजे भोसले म्हणाल्या, आपण सर्व मान्यवर पप्पांच्या शोकसभेसाठी आमच्या राजघराण्याच्या दु:खात सहभागी आहात. पप्पाविषयी सर्वांना आदर होता.तो आज दिसतोय. त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाला, पप्पा तुम्ही मला खूप लवकर सोडून गेला. माझी आई दोन वर्षापूर्वी 13 संप्टेबरला गेली तीच तारीख पप्पांनी निवडली आणि ते सोडून गेले. पप्पा माझं छत्र होतं,आपल्या मुलीला वडिलांचा काय आधार असतो हे सर्वांना माहित आहे. आई वडिल गेल्यावर जो घराला पोरकेपणा येतो तो सर्वांनी अनुभवला असतो. मी लहानपणी मला भाऊ पाहिजे असे म्हणायचे त्यावेळी  मम्मी  पप्पा म्हणायचे उदयनदादा , शिवेंद्रदादा, विक्रमदादा हे तुझे सख्खे भाऊच आहेत. मी आज एकटी नाही माझी सर्व भावंडे , नातेवाईक माझ्या सोबत आहेत. पप्पांचे राहणीमान अत्यंत साधे होते मात्र त्यांचे विचार खूप मोठे होते. छत्रपती घराण्याचे वलय त्यांनी जपले.शिवाजीराजेंचे राहिलेले स्वप्न पुर्ण करणार.
जिल्हा पोलिस प्रमुख अजयकूमार बन्सल: शिवाजीराजे भोसले यांचे व्यक्तीमत्व खूप मोठे होते. त्यांच्याशी माझा व्यक्तीगत संपर्क झाला नाही हे माझे  दुर्देव आहे. त्यांच्यावर लोकांचे प्रेम दिसते ते त्यांनी कमावलेले आहे. छत्रपतींचा वारसा त्यांना भेटला होता तो वारसा ते पुढे घेवून गेले.त्यांचे विचार पुढे घेवून गेले पाहिजे.

यावेळी  विनोद कूलकर्णी, अ‍ॅड. डी.जी. बनकर, अविनाश कदम, शंकर माळवदे, माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, माजी प्राचार्य पुरूषोत्तम शेठ, साहित्यिक सुनीताराजे पवार, वि. ना. लांडगे, डॉे.दत्तप्रसाद दाभोळकर,  प्रकाश गवळी, अ‍ॅड.बाळासाहेब बाबर, किशोर  शिंदे, डॉ.शाम बडवे,चंद्रकांत  नलावडे, मनोज कान्हेरे, ल.गो.जाधव, राजू गोडसे, सिध्दार्थ लाटकर,विश्वासराव देशमुख यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त  केला.यावेळी अमोल मोहिते, सुहास राजेशिर्के, फिरोज पठाण, प्रशांत आहेरराव, वसंतशेठ जोशी,अनिता घोरपडे, सुशांत मोरे, यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय,शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.नंदकूमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. 

error: Content is protected !!