वर्षा देशपांडे, तुषार भद्रे, नितीन दीक्षित यांना सातारचे रंगकर्मी गौरविणार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याचा लौकिक देशविदेशात पोहोचविणाऱ्या तीन नामवंत व्यक्तींचा सत्कार स्वातंत्र्यदिनी होत आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन ॲवॉर्ड पटकावणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, रंगभूमीवरील ५० वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे आणि विविध मानाचे पुरस्कार पटकावणारे पटकथा-लेखक, दिग्दर्शक नितीन दीक्षित या तीन कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सातारच्या रंगकर्मींकडून करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

ॲड. वर्षा देशपांडे
समाजात अर्धी लोकसंख्या असूनसुद्धा महिला निर्णयाच्या बाबतीत स्वतंत्र नाहीत. त्यांचे अधिकार मर्यादित आहेत. त्या प्रत्येक बाबतीत असुरक्षित आहेत, या बाबी विचारात घेऊन महिलांचं मोठं संघटन ॲड. वर्षा देशपांडे यांनी उभं केलं. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जन्मभूमी हीच वर्षाताईंची कर्मभूमी ठरली. दलित महिला विकास मंडळाच्या माध्यमातून महिलांना कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला देणं, त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांचं निराकरण करणं, असा त्यांचा प्रवास अनेक वर्षे सुरू आहे. लेक लाडकी अभियानच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विविध कामांमध्ये कधी जनजागृतीचा, तर कधी सक्रिय सामाजिक हस्तक्षेपाचा मार्ग स्वीकारला. हुंडाबंदीपासून दारूबंदीपर्यंत अनेक विषयांवर आंदोलनं केली. गावागावात महिलांचं मतदान घेऊन बाटली आडवी केली. ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबातील महिला आणि मुलींच्या वेदना जाणून घेऊन वर्षाताईंनी त्यांना मदत केली. बालविवाह रोखले. मुलींना त्यांच्या पायावर उभं केलं. स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असेल, तरच तिला निर्णयप्रक्रियेत स्थान मिळेल हे ओळखून त्यांनी नेटानं काम केलं. घराच्या कागदपत्रांवर पुरुषांबरोबर महिलांचं नाव लावण्यासाठी चळवळ उभारली. महिलांच्या आरोग्यासाठी संबंधित यंत्रणा, अधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केलं. लोकसंख्येत स्त्री-पुरुषांचं प्रमाण व्यस्त असल्यामुळं असंख्य प्रश्न उद्भवतात, हे जाणून हा असमतोल दूर करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. गर्भलिंगचाचण्या आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकामी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) सहकार्याने विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. संयुक्त राष्ट्रांकडून पॉप्युलेशन ॲवॉर्ड मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय व्यक्ती ठरल्या. यापूर्वी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि आघाडीचे उद्योजक जे. आर. डी. टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

तुषार भद्रे
रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून, ती एक चळवळ मानून काम करणारे ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीची पन्नाशी नुकतीच ओलांडली. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी असंख्य कलावंत घडवले. शिपान, भाकवान, गजर, कावदान यांसारख्या एकांकिकांमुळं ते चाकोरीबाहेरील लेखक म्हणून ते नावारूपाला आले. भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथांचं यथार्थ चित्रण करणारं त्यांचं कारान हे नाटक रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलं. भाषेपासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपण असलेल्या या नाटकाने प्रस्थापितांना खडबडून जागं केलं. त्याचबरोबर स्वार्थी जगातील वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेणारं लादेनच्या शोधात हे त्यांचं नाटकही सर्वार्थाने वेगळं ठरलं. रंगभूमीवर काम करताना मोबदल्याची अपेक्षा भद्रे यांनी कधीच ठेवली नाही. नाटक हे चरितार्थाचं साधन न बनवता मुक्तपणे विचार मांडले. रंगकर्मींच्या अनेक पिढ्या घडवणारा शिक्षक म्हणून भद्रे सुपरिचित आहेत. त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवणारे अनेक कलावंत आज नावारूपाला आले आहेत. कारकीर्दीची सुरुवात करताना विज्ञानाचा जागर हे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित मुक्तनाट्य त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत खेडोपाडी केलं. प्रसंगी चालत किंवा सायकलवरून जाऊन कलाकारांनी या मुक्तनाट्याचे एक हजारांहून जास्त प्रयोग केले. अंधश्रद्धेबरोबरच हुंड्याच्या कुप्रथेविरुद्धही भद्रे आणि लोकरंगमंचच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी आवाज उठवला आणि खेळ या पथनाट्याचे शेकडो प्रयोग केले. विविध कलांचा मिलाफ असलेला आर्ट फ्यूजन फेस्टिव्हल दरवर्षी भरवून तुषार भद्रे असंख्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देत आहेत. रंगभूमीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही या महोत्सवात केला जातो.

नितीन दीक्षित
प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक नितीन दीक्षित यांनी सातारच्या रंगभूमीवरून सुरू केलेला प्रवास आज राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत पोहोचला आहे. उल्टा-पुल्टा, त्यांच्या मानगुटीवर, कॉम्प्लेक्स अशा एकांकिकांच्या लेखनातून त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळातच आपली दिशा दाखवून दिली. कालांतराने मुंबईला जाऊन कठोर परिश्रम घेतले. प्रदीर्घ संघर्षातून त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून रसिकमान्यता मिळवली. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांसाठी विपुल लेखन केलं. त्यांच्या पटकथा आणि संवाद प्रेक्षागृहातील प्रत्येकाला आपले वाटले. धग, विष्णुपंत दामले बोलपटाचा मूकनायक, पाणी या चित्रपटांसाठी त्यांना पटकथेचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कडवी हवा या वेगळ्या वाटेवरील हिंदी चित्रपटाची त्यांनी लिहिलेली पटकथाही राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच कलीरा अतित या उडिया भाषेतील चित्रपटानेही लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. रूढ चौकटी मोडून त्यांनी आशयघन लेखन केलं. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या अवताराची गोष्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट कथा आणि दिग्दर्शनाचा महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि झी गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. अलीकडेच त्यांनी लिहिलेले व्ह्युटझिलोपॉच्ट्ली हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले. वेगळ्या देशातील, वेगळ्या संस्कृतीतील लोकांचा प्राचीन देव भारतीय व्यक्तीच्या देवघरात येऊन बसतो आणि त्यानंतर हौशा-गवशांचा खेळ सुरू होतो, असं चाकोरीबाहेरचं कथानक घेऊन आलेलं हे नाटक आशयविषयाच्या दृष्टीने समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं. सध्या पाणी या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला सर्व प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त होत असून, त्यामुळे सातारच्या रंगकर्मींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मान्यवरांची उपस्थिती

या कर्तृत्ववान त्रिमूर्तींच्या सत्कार सोहळ्यास साताऱ्याचे दोन सुपुत्र उपस्थित राहणार आहेत. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे तसेच लेखक, निर्माते आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले सचिन मोटे यांची या समारंभास उपस्थिती असणार आहे. सातारकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा रंगकर्मी ग्रुपने केले आहे.


You must be logged in to post a comment.