सातार्‍यात गोपीचंद पडळकरांच्या पुतळ्याचं दहन

हिंमत असल्यास जिल्ह्यात फिरून दाखवावं : राष्ट्रवादीचं आव्हान

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

आ. गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्त्वाखाली आणि युवा जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन ते पोवई नाका दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांसह मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं वेळीच मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, लॉकडाऊन काळात एकत्र जमून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 19आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे शरद पवार : सुनील माने
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करून मोठं होण्याचा प्रयत्न यापूर्वी बर्‍याच जणांनी केला पण ज्यांनी ज्यांनी पवारांवर टीका केली त्यांचं नाव राज्याच्या राजकारणात पुढं कधीच घेतलं गेलं नाही. पवारांवर अत्यंत खालच्या दर्जाची टीका करणार्‍या पडळकरांच्या बाबतीतही हेच घडल्याशिवाय राहाणार नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा शरद पवार म्हणूनच काम करतो हे पडळकरांनी लक्षात घ्यावं आणि हिंमत असेल तर जिल्ह्यात फिरून दाखवावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पडळकरांना दिलं.

पवारांच्या राजकीय योगदानाइतकं यांचं वयसुद्धा नाही : तेजस शिंदे
शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांचं गुणगान गातात.  त्यामुळं अशा ज्येष्ठ नेत्यांविषयी काय बोलावं आणि कसं बोलावं हे पडळकरांनी पहिल्यांदा त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांकडून शिकावं. शरद पवारांचं जेवढं राजकीय योगदान आहे तेवढं यांचं वय तरी आहे का ? त्यामुळं आपल्या चुकीच्या वक्तव्याबाबत माफी न मागता पडळकरांनी जिल्ह्यात पाऊल ठेवलं तर त्यांचं तोंड काळं करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी यावेळी दिला.

पडळकरांची कुवत ती काय ? : दीपक पवार
बहुजन समाजाचे नेते म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवारांविषयी बोलण्याइतपत आपली कुवतही नाही हे पडळकरांनी आधी समजून घ्यावं. त्यांच्यावर टीका करून स्वतःचं नाव मोठं करण्याचं घाणेरडं राजकारण करणार्‍या पडळकरांचा मी राष्ट्रवादीच्या वतीनं तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी यावेळी दिली.
error: Content is protected !!