Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातार्यात पुन्हा एकदा ‘रोल… कॅमेरा… अॅक्शन !’
सातारा जिल्हा
सातार्यात पुन्हा एकदा ‘रोल… कॅमेरा… अॅक्शन !’
20th June 2020
प्रतिनिधी
मिसेस मुख्यमंत्री’, ‘टोटल हुबलाक’ चे चित्रीकरण सुरू
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनासंकटात ‘लॉकडाऊन’ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ’रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे थांबलेले शूटिंग आता पुन्हा एकदा सुरू होत आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम व अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ’टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
जे कुठंच नाही ते सौंदर्य सातार्यात !
डो
ळे दिपवणारं सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाने केलेली मुक्तहस्ते उधळण, बारमाही वाहणार्या संथ कृष्णामाईचा काठ, शंभराहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईचं सौंदर्य यामुळे सातारा जिल्हा हा चित्रपटसृष्टीसाठी पूर्वीपासूनच पोषक वातावरण असलेला जिल्हा म्हणून ओळखला गेलाय. मुंबईत जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यात सह्याद्रीने भरभरुन दिले असून निसर्गतःच उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावली आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ’लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. उदा. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावलीचं खोरंही सुप्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.
हिंदी-मराठी चित्रपट निर्मात्यांचे सातार्यावर विशेष प्रेम
जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच परंतु अलिकडील काही वर्षांत प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा सातार्यात चित्रीकरण करण्याकडे विशेष ओढा राहिला आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीती स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा सातार्यात चित्रीत झालेल्या चित्रपटांची नावं न संपणारी आहेत. झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हूबलाक या मालिकांचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातच झाले.
स्थानिकांना रोजगार मिळवून देणारं क्षेत्र
जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ’एक खिडकी योजना’ ही देखील निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहायक, सहायक वेशभूषाकार, सहायक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांकरिता रोजगारनिर्मिती होते.
चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळणवळणासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतूनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावांमध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नात वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनात झालेली लक्षणील वाढ अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
… या नियम व अटींसह चित्रीकरणास परवानगी
* चित्रीकरण प्रक्रियेत सामील असलेल्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोव्हज वापरणे बंधनकारक.
* चित्रीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
* हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची कृत्ये करण्यास मनाई.
* दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर राखणे आवश्यक
* 65 वर्षांवरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करण्यास मनाई.
* चित्रीकरणा दरम्यान लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, सामूहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
* केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तू वापरणे.
* चित्रीकरणाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था करणे बंधनकारक.
* चित्रीकरणा दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम आदी साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.
सातारच्या मातीत घडलेल्या कलाकारांची यादी मोठी
जिल्ह्याने देखील चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने अनेक हिरे दिले. यामध्ये सिनेअभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे तसेच नवोदित कलाकार सागर कारंडे, संतोष साळुंखे यांचा समावेश आहे. पटकथा लेखक प्रताप गंगवणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवर देखील याच मातीने दिले.
सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आले असताना या व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा’सातारा पॅटर्न’ चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे. – तेजपाल वाघ (पटकथाकार)
होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. आता केवळ चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ’टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू केले आहे. तुम्हालाही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्या-खोर्यात तसेच माण- खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात, ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!!
– किरण माने (अभिनेते)
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
नरेंद्र पाटील यांच्यावरील हल्ल्यामागे बन्या, मन्या
बाधित 800 तर कोरोनामुक्त 600 च्या पार !
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.