नटनट्यांची उठाठेव केली नसती तर ही वेळ किसन वीरच्या प्रशासनावर आली नसती : सौरभ शिंदे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कुडाळ : प्रतापगड-किसन वीरच्या कराराचे तुनतुने वाजवता मग त्यातील अटींचे आपण पालन का केले नाही, असा सवाल करत कारखाना चालवायला घेताना ५१.४० कोटींची जबाबदारी असताना आठ वर्षांत अद्यापही आठ कोटींचे देणे बाकी ठेवले आहे. सत्तेचा उतमात करून शेतकरी-सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करताना नटनट्यांची व सेलिब्रिटींची उठाठेव करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत बसला नसता, तर ही वेळ किसन वीरच्या प्रशासनावर आली नसती,” अशी टीका प्रतापगड कारखान्याचे संचालक व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यावर केली आहे.

किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन प्रतापगड कारखान्याच्या व्यवस्थापनावर केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी कुडाळ (ता.जावळी) येथे प्रतापगडच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सौरभ शिंदे म्हणाले, ”किसन वीरने शेतकरी सभासदांच्या ऊसाचे पैसे एफआरपीप्रमाणे अद्याप दिले नाहीत. तसेच कारखाना करारावेळी प्रतापगडचे कामगार यादीत असतानाही त्यांना किसन वीर व्यवस्थापनाने सिझनल ठेवले. प्रतापगडच्या कामगारांचे चौदा महिन्यांचे वेतन दिले नाही.

आठ वर्षांचा लेखाजोखा करायचाच असेल तर जाहिरपणे करण्यास माझी तयारी आहे. प्रतापगडमध्ये किसन वीरने कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. उलट कारखान्यावर आणखी कर्ज वाढवून ठेवले आहे. प्रतापगड चालवायला घेतला ही चूक असेल तर तो आमच्या व्यवस्थापनाला परत द्यावा व चूक सुधारावी. स्वतःची अकार्यक्षमता आमच्या माथी मारु नये. आम्ही त्रास दिला म्हणून प्रतापगड चालला नाही म्हणता मग खंडाळा व किसन वीर कारखान्यांचे गाळप एवढे कमी का झाले, याचे उत्तर द्यावे. ऊसबील अजूनही दिले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले.

किसन वीरवर बोजा किती यांच्याशी प्रतापगडला देणे घेणे नाही. आम्ही कोणत्याही विषयावर उघड बोलण्यास तयार आहे. तयारी असल्यास जाहीरपणे व्यासपीठावार यावे. ”५२ हजार सभासद शेतकऱ्यांच्या चुली बंद करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा फुकटचा आव आणू नये. कोणताही कारखाना बंद ठेवणे हे शेतकऱ्यांवर अन्यायच म्हणूनच आमचा कारखाना आमच्या ताब्यात द्या, कामगारांचे जवळपास नऊ कोटी थकीत असून, प्रतापगडची वीजबील थकल्यामुळे वीजही कट करण्याची नामुष्की किसन वीरमुळे ओढवली आहे.

error: Content is protected !!