चला सातारकर, सवयभान राखूया : राजेंद्र चोरगे


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ’कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वांसमोर आरोग्य आणि आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला तोंड देत जगलंच पाहिजे नाहीतर भविष्यात आर्थिक संकट, भूकबळी, व्यावसायिक नुकसान आदी वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर या संकटावर मात करण्यासाठी भविष्यात होणार्‍या बदलास सातारकरांनी समर्थपणे तोंड देण्यासाठी ’सवयभान’ ही संकल्पना घेऊन ’मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ या उपक्रमांतर्गत सातारा शहरातील व्यावसायिक व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवूया,’ असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेत केले. 
’जिल्ह्यातील कोरोनासंकट अधिकाधिक गहिरे होत चालले असून त्याला धीराने आणि संयमाने तोंड देण्याची गरज आहे,’ असे मत राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केल्यानंतर या आवाहनास प्रतिसाद देत 20 ते 22 संघटना सातारकरांच्या मदतीसाठी आणि बचावासाठी पुढे सरसावल्या व त्यातून ’मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ हा ग्रुप स्थापन झाला. 
सातारा शहराला कोरोना विषाणूच्या विळख्यापासून दूर ठेवणे हा या ग्रुपचा उद्देश असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
’परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, व्यावसायिक सुरक्षित अंतर ठेवून शासन नियमानुसार व्यवसाय करत आहेत का, यावर लक्ष ठेवणे हे कार्य ही या रक्षक ग्रुपच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे सर्व काम करीत असताना शासन, नगरपालिका यांचे मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्या हातात हात घालून कर्तव्य भावनेतूनच स्वतःच्या व सातारकरांच्या रक्षणासाठी व कोरोनाबरोबर जगण्याची सवय लावून दैनंदिन दिनचर्या सुरळीत व्हावी हा म्हणून या रक्षक ग्रुपचा छोटासा प्रयत्न आहे,’ असेही चोरगे यावेळी म्हणाले.
हा नवीन प्रयोग सातारकरांच्या आरोग्यासाठी तसेच व्यावसायिक उन्नतीसाठी आहे. त्यामुळे सर्व सातारकरांनी सहकार्य करून मीच माझ्या सातारकरांचा रक्षक आहे आणि मी सवयभान या अभियानाचा घटक आहे म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने राजेंद्र चोरगे, जयेंद्र चव्हाण, शेखर घोडके, वसंत जोशी, श्रेणीक शहा, अजय देवी, मनोज देशमुख, यशवंत गायकवाड, ज्योती कारंडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
 ’सवयभान’ या अभियानाचा प्रारंभ ज्योती कारंडे (कोरोना मुक्त नर्स), मुख्याधिकारी शंकर गोरे व भरत राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या उपक्रमात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट, जाईटस ग्रुप ऑफ सातारा, सातारा कापड असोशिएशन, सराफ व सुवर्णकार असोशिएशन, सातारा नाभिक संघटना, पोवईनाका व्यापारी असोसिएशन, सातारा मिठाई व्यापारी संघटना, किराणा रिटेलर्स असोसिएशन, सर्व रिक्षा चालक मालक संघटना, सातारा हॉटेल मालक संघटना, साहस असोसिएशन (सनिटरी वेअर, हार्डवेअर व पेंट्स), सातारा मेडिकल होलसेल व रिटेलर असोशिएशन, सातारा बुक सेलर्स स्टेशनरी असोसिएशन, महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा संस्था, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट, अनंत सायकल कंपनी, बालविकास मंडळ शनिवार पेठ, सौरभ रायरीकर (सीए)  आदी  संघटना सहभागी झाल्या आहेत. या उपक्रमासाठी सातारा नगर पालिकेचे विशेष सहकार्य लाभणार आहे. 
’सवयभान’ प्रबोधनासाठी शहरात फिरणार समाजसेवक
हे अभियान राबवण्यासाठी समाजकार्याची आवड असणारी 20 ते 25 मुले सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठा, दोन्ही भाजी मंडई व प्रभागात सुरक्षा किट तसेच छत्रीसह फिरतील. दुकानदार व घरातील व्यक्तींना ’सवयभान’चे प्रबोधन करणे, टेम्प्रेचर चेक करणे, होमिओपॅथीच्या प्रतिकार शक्तीवर्धक गोळ्यांचे वाटप करणे अशा अनेक बाबी या समाजसेवक मुलांकडून केल्या जातील. त्यांना रक्षक ग्रुपमधील सर्व सदस्य मदत करतील, असेही चोरगे यांनी सांगितले. या सेवक मुलांना रक्षक ग्रुपकडून मानधनसुध्दा देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
सातारकरांसाठी सवयभानाचा मूलमंत्र !
आरोग्य : (प्रतिकारशक्ती वाढविणे) लोकांच्या मनात कोरोना या आजाराची जी काही अनाठायी भीती आहे. ती घालवून डॉक्टरांच्या माध्यमातून योग्य ज्ञान देणे.
सुरक्षितता : लोकांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छता तसेच स्वतःची व समाजाची काळजी घेण्याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन व प्रबोधन करणे.
सकारात्मकता : मनात सकारात्मक विचार असतील तर अनेक संकटांवर मात करता येते याची खात्री पटवून देण्याबाबत मार्गदर्शन करणे.















error: Content is protected !!