तुमच्या तालुक्यात बुधवार-गुरूवारी शाळा बंद राहणार का?

“ऑरेंज अलर्ट”मुळे प्रशासनाने घेतलेले निर्णय जाणून घ्या आणि मुलांना जपा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

कोणत्या तालुक्यात शाळा बंद?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या आदेशानुसार, पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यातील प्राथमिक शाळा बुधवार २० ऑगस्ट व गुरूवार २१ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील पर्जन्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी घेणार आहेत.

अंगणवाड्यांना दोन दिवस सुट्टी

पावसामुळे लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्याही २० व २१ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे देण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या पालकांना सूचना

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे की, पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, भूस्खलन, नदी-नाल्यांना पूर येणे अशा संभाव्य धोक्यांचा विचार करून शाळा व अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पालकांनी मुलांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहावे, अनावश्यक घराबाहेर पाठवू नये, तसेच पूरपाणी किंवा ओढ्यांच्या जवळ जाणे टाळावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

error: Content is protected !!