जेष्ठ काँग्रेस नेते प्रा. एन. एम. कांबळे यांचे निधन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम वकील प्रा. एन. एम. कांबळे यांचे नुकतेच निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय असलेले प्रा. एन. एम. कांबळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने १९८२ ते १९८६ आणि १९८८ ते १९९२ असे काम पाहिले. शिवाय, ते राज्य मंत्रिमंडळात तीन वेळा कॅबिनेट मंत्री होते. गृहनिर्माण, ग्रामीण विकास, कामगार, वस्त्रोद्योग, पुनर्वसन, राजशिष्टाचार विभागाचे त्यांनी काम पाहिले होते.

मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईजवळ बावधनचे असणाऱ्या प्रा. नरेंद्र एम. कांबळे यांनी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष या नात्याने काम पाहिले होते. मुंबई उच्च न्यायालयात १९५६ ते १९७६ या काळात त्यांनी वकील म्हणून प्रॅक्टिस केली. मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राध्यापक, मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य असलेले प्रा. कांबळे यांनी एके काळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक सहायक म्हणून काम केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे सचिव म्हणून त्यांनी काम केले. मुंबई महापालिकेत १९५७ ते १९६२ या काळात ते नगरसेवक होते. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य, राज्यसभेत तीन वेळा खासदार होते. राज्य सरकारच्या संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रा. कांबळे यांनी विविध संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून कामकाज केले आहे. उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर प्रा. कांबळे अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाले. तेथे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाखाली आले. डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय सोडून बीएससीमध्ये प्रवेश घेतला. नंतर मुंबईत येऊन एलएलबी कायद्याची पदवी संपादन केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७८मध्ये फुटली. तेव्हा प्रा. कांबळे इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभे राहिले.

error: Content is protected !!