सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी चेअरमन, डाव्या चळवळीचे खंदे नेतृत्व, साताऱ्यातील निष्णात फौजदारी विधिज्ञ अॅड. धैर्यशील पाटील (दादा) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते.
महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले तसेच सातार्यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अॅड. डी.व्ही. पाटील यांचा जन्म १४ जुलै १९४३ रोजी झाला. वकिलीची पदवी घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह देशभर त्यांनी ठिकठिकाणच्या विविध खटल्यांमध्ये काम केले. फौजदारी संहितेवर त्यांची कमालीची पकड राहिली. वकिलीचे काम करत असतानाच संघटन कौशल्य राबवत अनेक सामाजिक संघटनांवर त्यांची निवड झाली. गोरगरीब, कष्टकरी व श्रमिकांसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. कामगार व कष्टकरी समाजासाठी त्यांचे काम महत्वपूर्ण राहिले असून डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता.
अॅड. डी.व्ही. पाटील यांच्या मागे त्यांचा मुलगा अॅड. सिध्दार्थ पाटील हे वकिली क्षेत्राचा वारसा जपत आहेत. दुसरा मुलगा निशांत पाटील सातारा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत.
जेष्ठ रंगकर्मी, एसबीएन चॅनलचे संपादक तुषार भद्रे म्हणाले,निष्णात वकील डी.व्ही.पाटील दादा यांच्या अभ्यासू वृत्तीचा अनुभव एसबीएन चॅनेलच्या माध्यमातुन मी सुरू केलेल्या’भूमिशिल्प’ या कार्यक्रमाद्वारे सर्वांनाच घेता आला.त्यांनी इसवी सन १०० पासून १८५७ पर्यंत जे काही राजकीय बदल होत गेले. त्याबद्दल आणि मानवी संस्कृतीचा इतिहास याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रवास अगदी सोप्या भाषेत भूमिशिल्पच्या माध्यमातुन मांडला. त्यानंतर जस जशा राजकीय घटना घडत गेल्या त्याबाबतचा सखोल विश्लेणात्मक धांडोळा या कार्यक्रमात घेण्यात येत होता. त्यामुळे या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत गेला. ‘भूमिशिल्प’ हा कार्यक्रम जवळपास सलग ११ वर्षे सुरू होता. या कार्यक्रमाचे एकूण ५६० भाग झाले आहेत. त्यानंतर दादांच्या प्रकृतीमुळे त्यामध्ये खंड पडला.आज त्यांचं निधन झालं आहे.खरं तर दादा हे साताऱ्याच्या भूमीतील शिल्प होते. त्याच्या जाण्याने एका अभ्यासकाला सातारकर मुकले असून त्यांची पोकळी न भरता येणारी आहे. अशा अभ्यासू मित्र, मार्गदर्शकाचा मला सहवास लाभला हे माझे मी भाग्य समजतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच निर्मिका चरणी प्रार्थना करतो.
बार कॉन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, देशात नावाजलेले फौजदारी वकील, लाल बावटा युनियनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, प्रसन्न व देखणे व्यक्तीमत्व लाभलेल्या अॅड.कॉ. धैर्यशील पाटील उर्फ डि. व्ही. दादा यांचं दुख:द निधन मनाला चटका लावणारे, अतिदुख:दायी आहे.डि.व्ही दादांच्या रुपाने न्यायक्षेत्रातील बार ॲन्ड बेंच मधील एक अभ्यासू व्यक्तीमत्व आपण गमावलेले आहे.आंग्लभाषेवर भरभक्कम पकड असलेल्या दादांचे न्यायालयामधील विविध खटल्यांमधील केले जाणारे अर्ग्युमेंट ऐकण्यासाठी, वकील मंडळींसह अनेकांची गर्दी होत असे यावरुनच डि.व्ही. दादांचे अस्खलित प्रभावी वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व लक्षात येते.प्रख्यात विधीज्ञ आणि भारताच्या बार कौन्सिल या प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या पदावर अध्यक्ष म्हणून काम करुन सुध्दा कै. दादांना, त्यांच्या दैनंदिन जीवनात, सामान्य व्यक्तींविषयी विशेष जिव्हाळा होता. दादांनी त्यांच्या आईवडीलांचा म्हणजेच माजी आमदार आणि निष्णात वकील कै. कॉ. व्ही. एन. पाटील आणि कै.हेमलताबाई पाटील यांचा सामाजिक वारसा मोठया निष्ठेने पुढे चालवला. गोरगरिब, कष्टकरी, आणि पिचलेल्या अनेकांना दादा निस्वार्थीपणे न्याय मिळवून देतच तथापि त्यांना अनेक प्रकारांनी सहाय्य सुध्दा करीत असत.आपण केलेल्या सहाय्य किंवा मदतीची वाच्यता सुध्दा ते कधी कोठे करीत नसत हे त्यांचे वेगळे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.त्यांच्या काळाच्या पडदयाआड जाण्याने कायद्याच्या विश्वामधील कधीही भरुन येवू न शकणारे प्रचंड नुकसान झाले आहे.पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुखा:त व्यक्तीश: आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी निसर्गेश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
– श्री. छ. खा. उदयनराजे भोसले
You must be logged in to post a comment.