रंगभूमीवरील देदीप्यमान कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज मंगळवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे सातारकरांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तुषार भद्रे यांनी १९७५ मध्ये रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकरंगमंच या संस्थेची स्थापना त्यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी अशा विषयांवर गावोगावी पथनाट्ये करून प्रबोधन केले. विज्ञानाचा जागर या कार्यक्रमाचे हजाराहून अधिक प्रयोग खेडोपाडी झाले. ॲज पेल ॲज डेथ, दौरा, शिपान, भाकवान, गजर अशा सामाजिक विषयांवरील एकांकिका लिहून त्यांनी दिग्दर्शित केल्या. तसेच अन्य लेखकांची अनेक नाटकांचे आणि एकांकिकांचे कुशलतेने दिग्दर्शन केले.

कारान या दोन अंकी नाटकाचे लेखन आणि प्रयोग हा श्री. भद्रे यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. गावकुसाबाहेर पालांमध्ये राहणाऱ्या भटक्या समाजातील लोकांच्या जीवनावर आधारित हे नाटक मराठीतील एक मैलाचे नाटक ठरले. याखेरीज लादेनच्या शोधात हे त्यांचे दोन अंकी नाटकही यशस्वी ठरले.रंगभूमीला समर्पित असे असंख्य रंगकर्मी घडविण्याचे काम श्री. भद्रे यांनी सातत्याने केले. प्रायोगिक रंगभूमीवरील कलावंतांबरोबरच व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट, मालिका क्षेत्रातही त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. अभिनय प्रशिक्षणाचे वर्ग श्री. भद्रे सातत्याने घेत असतात.

श्री. भद्रे यांनी साताऱ्यात सुरू केलेला आर्ट फ्यूजन फेस्टिव्हल सातारच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. चित्र, शिल्प आदी दृश्य कलांसोबत रंगभूमीशी संबंधित अनेक प्रयोग आणि प्रयत्नांची दखल या महोत्सवात घेतली जाते. त्यामुळे दरवर्षी सातारकर कलावंतांसाठी ही पर्वणीच ठरते.
त्यांच्या सुवर्णमयी कामगिरीबद्दल होत असलेल्या सत्कार समारंभास मोठ्या संख्येने सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सातारच्या रंगकर्मींनी केले आहे.

You must be logged in to post a comment.