अजितदादांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : शालिनीताई पाटील

कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कवडीमोल भावाने गिळंकृत केला. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा अधिकार वापरून बेकायदेशीरपणे जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे अजितदादांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे. अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. उच्च न्यायालयाने अजितदादांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खाजगी संचालकांच्यावर गुन्हे दाखल केले. आज ई. डी. च्या माथ्यमातून साखरकारखाना जप्त करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई ई.डी. च्या माध्यमातून सुरु आहे.

कमी किमतीत सहकारी साखर कारखाने गिळंकृत करणाऱ्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंत्री मंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्य शासनाकडे राज्यपालांनी करावी अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी साखरकारखान्याचे व्हाइस चेअरमन श्रीरंग सापते ,संचालक पोपटराव जगदाळे, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक अक्षय बर्गे, काकासाहेब कदम, शंकर मदने उपस्थित होते.

error: Content is protected !!