सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा : ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत एकेरी भाषेत बोलणे त्यांना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत; पण त्यांचे तोंड बंद करण्याची तसेच जशास तसे उत्तर देण्याची ताकद शिवसैनिकांत आहे,’ असा रोखठोक इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्याचा आढावा घेतला. पुढील दोन महिने याबाबत प्रभावी काम करण्याचे ठरविले आहे. तशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आता प्रत्येक तालुक्यातील १० प्रमाणे जिल्ह्यातील ऐकूण ११० मुलींला स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. हे धडे प्रशिक्षितांकडून देण्यात येतील. यासाठी प्रसंगी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी मिळविण्याचा प्रयत्न करु. येत्या तीन महिन्यांत काय फरक पडला व किती फलनिष्पत्ती झाली ते लक्षात येईल. याबाबतच अहवाल आल्यानंतर महिला सुरक्षाबाबतचा हा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू.
जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘अतिवृष्टी व भूस्खलनामुळे अपरिमीत हानी झाली. पश्चिम महाराष्ट्रात पाटण तालुका अधिक बाधित झाला आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही घटनांच्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिवसातून दोनवेळा संपर्क करून माहिती घेतात. भूस्खलनातील लोकांसाठी तात्पुरता निवारा करण्यासाठी महिना ते दीड महिना एवढा वेळ लागू शकतो. लोकांचे सुरक्षित व कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. धोकादायक जागा नसावी, यासाठी पुनर्वसनाचा विस्तृत आराखडा तयार करून राज्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील नुकसानीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला १०० कोटी देऊ, असे सांगितले आहे. पण, घरे, रस्ते पिके, पाणीपुरवठा योजना, जलसंधारणासाठी किती निधी लागेल तोही देऊ असेही, स्पष्ट केले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात सतत बोलत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मंत्री देसाई यांनी राणे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. तसेच जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दिला.
You must be logged in to post a comment.