वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात : शंभूराज देसाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, प्रशासकीय आणि पोलीस अधिकार्‍यांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देसाई यांनी गुरुवारी सकाळी कोरेगाव येथे भेट देऊन पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम,  गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया
घाडगे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.

देसाई पुढे म्हणाले की, संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने विनाकारण बाहेर फिरणार्‍यांना तोंडी सूचना द्या, उद्यापासून मात्र कठोर कारवाईला सुरुवात करा. कोरोना रोखणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे, त्यामुळे सर्वच विभागांनी आपले कर्तव्य चोखपणे बजवावे. तालुक्यात लसीकरणाचा वेग फारच कमी आहे, तो वाढविला पाहिजे. ३५ टक्के म्हणजे काहीच नाही, त्याबाबत सर्वच आरोग्य कर्मचार्‍यांना सूचना द्या, असेही देसाई यांनी नमूद केले. प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के असल्याबद्दल मात्र मंत्री देसाई यांनी कौतुक केले. आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे,
ऑक्सिजन बेड वाढविण्याबाबत निर्णय घ्या, आरोग्य विभागावर निश्‍चितपणे ताण आहे, मात्र परिस्थितीचे गंभीर स्वरुप पाहता, सर्वांनी वेळेकडे न पाहता काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी मनोहर बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, राहूल बर्गे, अमोल मेरुकर, मुकुंद बर्गे, कुमार शिंदे, प्रशांत बर्गे, मंडळ अधिकारी किशोर धुमाळ, तलाठी शंकर काटकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!