शरद पवार हे महाराष्ट्राचे आत्मसन्मान व आत्मा आहेत : खा. अमोल कोल्हे

रहिमतपूर येथे विराट जनसमुदायांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात

रहिमतपूर,(भूमिशिल्प वृत्तसेवा): यंदाची लोकसभेची लढाई ही चव्हाण साहेबांच्या विचारांची व देशाच्या हिताची आहे. स्वाभिमान व लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढायची आहे. राज्यात महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट असल्याने परिवर्तन हे निश्चित असून पुढची सत्ताही आपली राज्यात व केंद्रात असणार आहे. शरद पवार साहेबांनी यशवंत विचार जोपासून सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रात केले आहे. पवार साहेबांचा शेतकरी हा आत्मसन्मान आहे. प्रत्येक तरुणाला रोजगार देऊन ते आत्मसन्मान करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माता-भगिनींना ३३ टक्के आरक्षण देणारे ते महिलांचे आत्मभान आहेत. म्हणूनच होय,शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा व आत्मसन्मान आहेत, असे प्रतिपादन खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी मोदींना प्रतिउत्तर दिले आहे.

रहिमतपूर ता.कोरेगाव येथे इंडिया तथा महाविकास आघाडीचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी खा.डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ॲड.वर्षा देशपांडे, डॉ. सुरेश जाधव, अजित चिखलीकर-पाटील, शहाजी क्षीरसागर, रूपाली शिंदे, विजयराव कणसे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा.अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्र हा स्वाभिमानी व ताठ मानेने जगणारा आहे. शरद पवारांचे  आम्ही निष्ठावंत असल्याने स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळलेलो नाही.आपल्या मातीतील माणसांसाठी स्वाभिमानाने ठामपणे उभे राहणार आहे. आजही ८४ वर्षाचा योद्धा न डगमगता, उन्हातान्हाची परवा न करता लढत आहेत.ते गुडघ्यावर येत नाहीत, हा दिल्लीश्वरांना प्रश्न पडला आहे. आपला देश हा महासत्ता बनेल या आशेवर सन २०१४ ला लोकांनी विश्वासाने साथ दिली. परंतु गेल्या दहा वर्षापासून लोकांची फसवणूक करून अपेक्षाचा भंग भाजपने केला आहे. शेतकरी व जवानांची देशातील सध्याची दशा पाहता या देशातील ‘जय जवान,जय किसान’ हे ब्रीदवाक्यच चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच देशावर कर्जाचा भार असल्याने श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच या वेळेस सावध रहा व जागरूकतेने मतदान करा. यशवंत विचारांची जबाबदारी ही तुमच्या खाद्यावर असून ही निवडणूक कोणाच्याही प्रतिष्ठेची नसून तुमच्या भविष्याची आहे.

महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात घेऊन भाजपाला राज्यात ५० सभा घ्यायला लागतात, येथेच कळते की ही निवडणूक इंडिया आघाडीने जिंकली आहे. गादीला मुजरा करायचा परंतु गादीला मुजरा करताना तुतारी वाजवायला विसरायची नाही. जर तुतारी वाजली तरच देशाच्या स्वाभिमानाला बळ येणार आहे. या जगावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या जगात प्रकाशाने अंधारावर विजय मिळवता हेच आपणास आ.शशिकांत शिंदे यांना मतदान करून साध्य करायचे आहे. असे कोल्हे म्हणाले.

आ.शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभेची लढाई ही चव्हाण साहेबांच्या विचारांची व देशाच्या हिताची आहे. भाजपने जे काही कारनामे केली आहेत त्याला जनता माफ करणार नाही.हुकूमशाही व फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट असल्याने परिवर्तन हे निश्चित होणार आहे. दिल्लीचा तख्त हा महाराष्ट्रातच उलटू शकतो, हा इतिहास दाखवून देण्याची वेळ आली आहे. मागच्या वेळी विरोधी उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. आजवरही आम्ही त्यांचा आदर ठेवतो, फक्त खोटे बोलू नका. पूर्वीचा खासदार फंड हा लोकांना भेटतच नव्हता. तो त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्याच आजूबाजूला फिरत होता. लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतरही ते संपर्कहीन राहिले होते, अशी टिका आ.शिंदे यांनी विरोधी उमेदवारावर केली.दिल्लीला गेल्यावरही मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असेन. शिवाय लोकांच्या विकासासाठी संपूर्ण खासदार फंडही देईन, अशीही ग्वाही आ.शशिकांत शिंदे यांनी दिली.

आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीमुळे देशाची पुढची दिशा ठरणार आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशासाठी घातक आहेत.मोदींच्या कालावधीत देशाचा विकासदर कमी झाल्याने अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशातील बेरोजगारी व महागाई वाढण्यास मोदी सरकार जबाबदार आहे. मोदी कराच्या स्वरूपात तुमच्याकडून वर्षाला ३२ कोटी रुपये काढून घेत आहेत. शिवाय शेतीमालाची निर्यात बंदी केल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. मोदी की गॅरंटी म्हणून स्वतःची राजवट चालवली जात आहे. हा देश हुकूमशाहीच्या दिशेने निघाला आहे. तुम्हाला देश व संविधान वाचवायचे असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला निवडून द्यावे लागेल. तरच संविधान आधारावर लोकशाही टिकून लोकांचे प्रश्न सुटतील व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन लाभेल असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!