कष्टकरी कुटुंबातून आलेल्या शशिकांत शिंदेना निवडून देण्याचं आवाहन
वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा मतदार संघातील उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांची निवडणूक वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यातील जनतेने हाती घेतली आहे.लोकसभेत जाण्याची संधी त्यांना नक्कीच मिळणार आहे. देशाचे राजकारण हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजपला मतदार राजा त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाईतील जाहीर सभेत बोलताना केले.
सातारा लोकसभा मतदार संघातील शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाईच्या भाजी मंडईत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालक मंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उमेदवार आ. शशिकांत शिंदे, भारत पाटणकर, राजेंद्र शेलार, सारंग पाटील, अभिनेत्री अश्विनी महांगडे, वर्षा देशपांडे, अल्पनाताई यादव, दिलीप बाबर, डॉ. नितीन सावंत, प्रसाद सुर्वे, डॉ. सतीश बाबर, रमेश गायकवाड, विराज शिंदे, जयदीप शिंदे, संदीप देसाई, केदार गायकवाड, ॲड.विजयसिंह पिसाळ, ॲड. निलेश डेरे, प्रताप यादव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, विरोधकांना जाणीवपूर्वक त्रास देवून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम भाजपकडून चालू आहे. विकासाची फक्त जाहिरात बाजी करून जनता यावेळी भुलणार नाही, मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात येत आहेत. पराभवाच्या भीतीने मोदी राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. अमित शहा म्हणतात शरद पवारांनी काय केले, आणि आपण काय केले सांगत नाहीत, २००४ मध्ये मी कृषिमंत्री होतो, त्यावेळी अन्नधान्य कमी असतानाही शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यावेळी शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटी कर्ज माफ केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी दोन पक्ष फोडून परत आलो आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढली, त्यांच्यावरही खालच्या पातळीवर जावून टीका करण्यात येते, नेहरू-गांधी घराण्यावर टीका करण्यात धन्यता मानतात, मोदींच्याकडे कै. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे समोरचा उमेदवार जाहीर करतो परंतु त्यांना दिवस आणि रात्र यातील फरकच लक्षात येत नाही. सध्या लोकसभेची निवडणूक आहे हे लक्षात आल्यास धन्य…! अशी उपरोधिक टीका शरद पवार यांनी केली.
गुजरात मध्ये महिलेवर अत्याचार करणाऱ्यांचा सन्मान करतात. विरोधी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली, देशात हुकूमशाही चालू आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवणुका दोन दोन वर्षे घेतल्या नाहीत. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर, कै.लक्ष्मणराव पाटील, यांच्या विचारांना पुढे घेवून जाणारा आहे. म्हणूनच महाविकास आघाडीने सर्वसामान्य जनतेतील, जावळीसारख्या दुर्गम भागातील उमेदवार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी वाईकरांची आहे.भाजपकडून ४०० पारचा नारा हा देशातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल लोकशाही संपविण्यासाठी घातलेला घाट आहे. मोदींच्या राज्यात देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे जाणारी आहे. तसेच देशाचे संविधान धोक्यात असून ते वाचविण्यासाठी इंडिया सरकारला सत्तेत आणण्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या ४ जूनला देशातील जनता मोदी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसून इंडिया आघाडीला भरघोस यश मिळणार आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांचे गठबंधन असलेली महाविकास आघाडी चांगले यश संपादन करेल यात शंका नसून शेतकरी कुटुंबातून आलेल्या शशिकांत शिंदेना निवडून द्या. सध्याची लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. वाई विधानसभा मतदार संघातील मान गादीला असला तरीही मत मात्र कष्टकरी उमेदवाराला दिले जाणार असल्याची खात्री शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिली.
माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, निवडणुकीतील अपयश लक्षात आल्यानेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा मतदार संघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांना अटक करण्याचा घात घातला आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त करीत मोदी सरकारच्या काळात झालेल्या चुकीच्या निर्णयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात तीनही पक्ष अतिशय जोमाने निवडणूक लढवीत आहेत. श्रीनिवास पाटील यांनी अलंकारीत भाषेत तुतारीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या देशात संविधान वाचविण्याची लढाई सुरु असून मोदी सरकारने कितीही मोठ्या वल्गना केल्या तरीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय रथ कोणीही रोखू शकत नाही. देशात विकासाचा खोटा डोलारा उभा करून मतदारांची फसवणूक करून निवडणूक जिंकू शकत नाही, येणाऱ्या ४ जूनला मोदींचा खरा चेहरा सामान्य जनतेसमोर येणार असून इंडिया आघाडी देशात चांगले यश संपादन करणार आहे. राहुल गांधींच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम चालू आहे. आजच्या तरुणांचा चेहरा म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पहिले जाते. गांधी घराण्यावर टीका करण्यापलीकडे भाजपा काहीही करीत नाही. सर्वसामान्य जनतेचे त्यांना देणेघेणे नाही.
उमेदवार शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्यावर कितीही केसेस दाखल केल्या तरीही शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही. लोकसभा निवडणूक आल्यानेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांनी रडीचा डाव न खेळता मैदानात येवून निवडणूक लढावी, समोरच्या उमेदवारामुळे माझी निवडणूक सोपी झाली. लक्ष्मण तात्या, मदन आप्पा पिसाळ, यांच्यासह जिल्ह्यात चव्हाण साहेबांची आठवण सर्वांना येत आहे. निष्ठावंतांना त्रास देण्याचे काम एकनाथ शिंदे सरकार करीत आहे. सात तारखेपर्यंत एवढं काम करा की अंडर करंटचा स्फोट झाला पाहिजे. जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी शिवाजी महाराजांच्या पडस्पर्शाने पावन झालेला सातारा मतदार संघात शशिकांत शिंदे यांना संधी दिल्याने निष्ठावंतांचा सातारा म्हणून ओळखला जाईल. मराठा आंदोलकाना नवी मुंबई येथे मोलाचे सहकार्य केले. राजकारण हे विकासाचे पाहिजे मोदींच्या काळात देशावर टिप्पट कर्ज झालं आहे.
भारत पाटणकर म्हणाले, देशात हुकूमशाही विरुद्ध जनशक्तीची लढाई चालू आहे. सातारा जिल्हा कष्टकरी जनतेचा आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता पाण्यावाचून वंचित आहे. मोदीचें राज्य अत्याचाराचे राज्य आहे. शशिकांत शिंदे हे प्रामाणिक जनतेची सेवा करतील. वाई मतदार संघ हा विजयामध्ये निर्णायक आघाडी देईल. या भागात माथाडी कामगार मोठया प्रमाणात आहे. मतदार संघातील जनता पाण्यापासून वंचित असून जनतेला पाणी देण्याचें प्रामाणिक प्रयत्न करेल.
यावेळी वाई विधानसभा मतदार संघातील शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
You must be logged in to post a comment.