यशवंत विचार सांगणाऱ्या शरद पवारांनी फरार आरोपीला उमेदवारी दिली; आ.महेश शिंदेंचा घणाघात

शशिकांत शिंदेंच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे.त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकारच नाही. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या फरार आरोपीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने पवारांना यशवंत विचाराचा विसर पडल्याचे दिसत आहे. अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेनेचे (शिंदे गट)आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केली. दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेच्या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात शनिवारी अपील दाखल केले असल्याचं शिंदे यांनी सांगितले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार महेश शिंदे यांनी नवी मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्या प्रकरणावरून शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली.

शशिकांत शिंदेंसारख्या गुन्हेगारी वृत्तीच्या उमेदवाराची पाठराखण करणाऱ्या शरद पवार यांची यशवंत विचारांवर बोलण्याची लायकीच नाही, अशा सडेतोड शब्दात टीका करून आमदार शिंदे पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या काळात त्यांच्याकडे असणारी संपत्ती आणि सध्या राजकारणात निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शरद पवार यांची मालमत्ता यांचा लेखाजोखा मांडल्यास यशवंत विचारांची भाषा त्यांच्या तोंडी अजिबात शोभत नाही. शौचालय घोटाळा प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आठ जण आरोपी असून या घोटाळ्यातील शासनाने उल्लेख केलेली रक्कम साडेसात कोटी असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम खूप मोठी आहे. हे प्रकरण उघडकीस येत आहे म्हटल्यावर विविध व्यापारी यांच्या खात्यांवर १५ ते ३० लाखांपर्यंतच्या रकमा वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.साधारण २५ ते ३० कोटी रुपयांची ही आकडेवारी असून याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. आणि हेच पैसे शशिकांत शिंदे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत वापरत असल्याची टीकाही आमदार महेश शिंदे यांनी केली.

शशिकांत शिंदे यांचा शौचालय घोटाळा आम्ही नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात सचिव स्तरावरील समितीने हा घोटाळा बाहेर काढला आणि त्यांच्याच पक्षाचे बाळासाहेब पाटील सहकारमंत्री असताना कोर्टात सिद्ध झाला आहे. एकाच ठेकेदाराला सातत्याने ठेका देण्याच्या प्रकारावरून बाळासाहेब पाटील यांनीच दिलेल्या जबाबामध्ये याबाबत आवाज उठवण्यात आला आहे. व्यापारी आहे म्हणून गाळा घेतला, असे शशिकांत शिंदे यांचे म्हणणे पूर्णपणे खोटे आहे. त्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती पाहता ते मार्केट कमिटीचे व्यापारी किंवा माथाडी होऊ शकत नाहीत.शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ या स्वतःच्याच खाजगी संस्थेसाठी तीनशे रुपये स्केअर फुट दराने गाळा घेणे, कोणत्या नियमात बसते तसेच ऋषी,आर्यन एंटरप्राईजेस, दिशा एंटरप्राईजेस या कोणाच्या संस्था आहेत, हे शशिकांत शिंदे यांनीच एकदा जाहीर करावे, असे आवाहनही महेश शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केले.

शशिकांत शिंदे यांनी एका गुन्ह्यात जामीन घेतला आहे तर दुसऱ्या गुन्ह्यात अद्यापही जामीन घेतलेला नाही. त्या गुन्ह्यात ते अजून फरार आहेत.अशा फरार आरोपीला यशवंत विचार सांगणाऱ्या शरद पवारांनी उमेदवार म्हणून उभे केलं हे चुकीचं आहे.तसेच आम्हाला कुणाला तुरुंगात टाकायचे नाही जो काय निर्णय आहे. तो कायद्यानुसारच होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण काढले असे म्हणणे चुकीचे आहे. सन २०१३ पासून ही न्यायालयीन लढाई सुरू आहे. १६ डिसेंबर २००६ ला गाळे ताब्यात दिले असतील आणि केवळ सभापतीच्या मान्यतेने ४४ गाळे शशिकांत शिंदे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी बळकावण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यावेळी मी त्यांचा विरोधक किंवा आमदारही नव्हतो त्यामुळं जाणीवपूर्वक त्यांच्यावर आरोप करायचा संबंधच येत नसल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तर राजकीय संन्यास घेईन..

बाजार समितीच्या प्रकरणात मी कुठेही नसून न्यायालयातील हे प्रकरण शासनस्तरावर सुरू आहे.त्यामध्ये सरकारी वकील काम पाहत आहेत.त्यामध्ये जर माझा काही संबंध असेल तर राजकारणातून संन्यास घेईन, असेही आ.महेश शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

error: Content is protected !!