कोरेगावातून लढलो असतो, तर मला त्रास झाला नसता : शशिकांत शिंदे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “मी जिल्हा बँकेसाठी कोरेगावातून लढलो असतो, तर मला त्रास झाला नसता. पण, कोरेगावातील स्थानिकांना संधी मिळणे आवश्यक आहे, ही माझी भावना आहे. त्यामुळे बँकेसाठी जावळीतून लढतोय आणि संघर्षाशिवाय मला काहीच मिळत नाही, असे मत आमदार शशीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगावात झालेल्या मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सुनील माने, नितीन पाटील, लहूराज जाधव, उमेदवार शिवाजीराव महाडिक, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे, कांचन साळुंखे, राजश्री पाटील तसेच शहाजी क्षीरसागर, मंगेश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, कांतीलाल पाटील, सुरेश साळुंखे, लालासाहेब शिंदे, तानाजीराव मदने, सुरेखा पाटील, शीला झांजुर्णे, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, प्रताप कुमुकले आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, “सरड्याप्रमाणे रंग बदलणारे कोरेगावात कुरबुरीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शरद पवार, अजित पवार या नेत्यांच्या नावावर कोरेगावात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखला असता, तर त्यांच्याविषयी निश्चितच आपुलकीची भावना राहिली असती. कोरेगावात ९० पैकी ७७ मतदार राष्ट्रवादीच्या विचारांचे आहेत. त्यामुळे हे मतदार फुटणार नाहीत. फायद्या तोट्यापेक्षा माझ्या दृष्टीने निष्ठेला महत्त्व आहे. त्यामुळे शिवाजीराव महाडिक यांच्यासह सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील.”

आगामी काळात लागणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध निवडणुकांना आपणा सर्वांना पक्ष म्हणून एकदिलाने सामोरे जावे लागेल, असे नमूद करून आमदार शशिकांत म्हणाले, “मी बँकेसाठी कोरेगावातून लढलो असतो, तर मला त्रास झाला नसता. पण कोरेगावातील स्थानिकांना संधी मिळणे आवश्यक आहे, ही माझी भावना आहे. त्यामुळे बँकेसाठी जावळीतून लढतोय आणि संघर्षाशिवाय मला काहीच मिळत नाही.”

error: Content is protected !!