सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे वातावरण तापले असून आपली वर्णी बॅंकेत लावण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे जावली विकास सेवा सोसायटी गटातून उमेदवारी करणार आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शिंदे यांच्यामधील संबंध ताणले आहे. जावली तालुक्यातील सर्जापूर येथील एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदे यांना नाव न घेता टिका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शशिकांत शिंदे यांनी कुडाळ मध्ये जावून त्यांना आव्हान दिले आहे.
‘मी फक्त निवडणुकीसाठी जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी इथलाच असतो. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत जावळीत सर्व काही वातावरण चांगलं होतं म्हणून फारसं लक्ष देत नव्हतो. मात्र, यापुढे जावळी तालुक्यात यावं लागेल. मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आमदार यांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला आहे. कुडाळ येथील पिंपळबन बाल उद्यान लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शशिकांत शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
सर्जापूर येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता निवडणुकीपुरते जावळीत येणाऱ्यांना भुलू नका, असा घणाघात केला होता. त्यालाच प्रतिउत्तर देताना शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शशिकांत शिंदे हा नेहमीच संघर्ष करत आलेला लढवय्या आहे. माझा राजकीय प्रवासाचा उदय जावळीतूनच सुरू झाला असून, राजकारणात सगळेच पत्ते आताच ओपन करायचे नसतात. वेळ आल्यावर कोणता पत्ता कधी टाकायचा हे मला चांगलंच माहीत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक होईल किंवा नाही हे ज्या त्या वेळी ठरेल. मात्र, लढणे हे शशिकांत शिंदे याच्या रक्तात आहे. त्यामुळे लढाई कोणतीही असो मी मागे हटत नाही. काहीही झाले तरी माझी जावळीतून उमेदवारी नक्की आहे,’ असा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जावळीच्या आजी- माजी आमदारांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्यामुळे जावळीतील राजकीय वातावरण काही प्रमाणात ढवळून निघालं आहे. त्याचे पडसाद उमटत असून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
You must be logged in to post a comment.