प्रशासन कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी : शशिकांत शिंदे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्यांच्याकडे जिल्ह्याची सुत्रे आहेत, निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असे प्रशासन प्रमुख हे कार्यालयात बसून कागदी घोडे नाचविण्याचे काम करत होते. ते फिल्डवर फिरकलेच नाहीत. त्यांना कोरोनाची दाहकता जाणवलीच नाही. प्रशासनच कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे एकदम चुकीचे आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

काल काही प्रसिध्दी माध्यमांमध्ये जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी कोरोनाच्या लढ्यात कमी पडतात, अशी टीका झाली होती, त्यावर स्पष्टीकरण देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, साताऱ्यात जंबो कोविड हॉस्पिटलची उभारणी करत असताना पाचशेपेक्षा जास्त बेड्स असावेत, अशी सूचना केली होती, मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील अधिकारी कितीवेळा जिल्हा फिरले, जंबो कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर्सला भेटी दिल्या, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचेच अनुकरण अन्य अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केले. गावपातळीवर, वाडीवस्तीवर जाऊन त्यांनी कामच केले नाही.

जिल्ह्याला पहिल्यापासून रेमडीसीवीर इंजेक्शन्स, औषधे, ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळत होते, जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर त्रुटी आहेत, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे या भावनेने सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटूया, त्यांच्या निदर्शनास गंभीर परिस्थिती आणूया, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती, या संदर्भात सर्वांनी भेटून नियोजन करण्याचे ठरले, परंतु त्या संदर्भात कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही, त्यात आमचा काय दोष? जर लोकप्रतिनिधी एकत्रित आले असते तर प्रशासनावर दबावगट तयार झाला असता आणि कोरोनाचे काम गतीने झाले असते. जर लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेली दाहकता वेळीच शासनाच्या निदर्शनास आली असती, तर सातारा जिल्ह्यावर ही वेळ आलीच नसती, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.काही जणांनी कोविड सेंटर्स सुरु केली, त्याची प्रसिध्दी झाली. मात्र कोविड सेंटर्स काढली असली तरी रुग्णांकडून बिल घेण्यात आले आहे. आम्ही मात्र सर्व औषधोपचार मोफत करत आहोत, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मदत करण्यासंदर्भात ठराव मांडण्याचे सूचित केले होते. आम्ही आमच्या पध्दतीने काम करत आहोत. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही जनतेशी अनेकवर्षे जोडले गेलो आहोत, आमच्यावर शासनाने जबाबदारी सोपविली असती, तर आम्ही हे काम शंभर टक्के पूर्ण क्षमतेने, जबाबदारीने पूर्ण केले असते. प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता, आम्ही आमच्या पातळीवर कोरोनाला रोखण्याचे काम पहिल्यापासून केले आहे, असेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.इतर लोकांसारखा व्यवसाय केला नाही

आम्ही कोरोना काळात काम करत असताना केविड सेंटर्स उभे करताना इतर लोकांसारखा व्यवसाय कधी केला नाही. कोरेगावच्या चॅलेंज अँकॅडमी कोविड सेंटर सुरु केले असून, तेथील रुग्णांना सर्वच गोष्टी आम्ही मोफत देत आहोत आणि भविष्यात देखील देत राहणार आहोत, मात्र या बाबींची कधी प्रसिध्दी केली नाही, असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी लगावला.

error: Content is protected !!