सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना जाहीर झाला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राबवण्यात येणार्या पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर झोकून देवून काम केले. कोरोना काळात कोविड सेंटर उभारण्यापासून, ऑक्सिजन निर्मिती प्लांट, लसीकरणापर्यंत त्यांनी सूक्ष्मनियोजन करुन मदत कार्य केले. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत बाधित गावांना भेट देवून त्याठिकाणी उपाययोजना केल्या. जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे मोठे योगदान आहे.
महाबळेश्वरच्या विकासाचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आराखडा तयार केला असून मुख्य बाजारपेठ विकसित करून चौकांचे सुशोभिकरण होणार आहे.हेरिटेजमध्ये असलेल्या लायब्ररी इमारतीचे नुतनीकरण केले जाणार आहे.
महाबळेश्वरच्या विकासासाठी 52 कोटींचा निधी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रेरणेतून याच महाबळेश्वरलगतच्या पाच गावांमध्ये ‘हिलदारी अभियान’ राबवण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे दि. 8 रोजी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. यशोमती ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.