सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी गावपातळीवर विलगीकरण कक्ष करण्यात यावे तसेच ग्रामदक्षता समितीने गावातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात आणावे, अशा सूचना आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण तालुक्यातील 7 गावांना भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. तरडगाव येथील भेटीदरम्यान आमदार दिपक चव्हाण उपस्थित होते. या भेटी दौऱ्यात फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपकेंद्रातील डॅाक्टर, नर्स, आशा सेविका तसेच खाजगी डॅाक्टरांचा सहभाग घेण्यात यावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये सर्व सोई पुरवल्या तर रुग्ण तेथे येण्यास विरोध करणार नाहीत. विलगीकरणातील रुग्णांसाठी योगा, याबरोबरच इतर मनोरंजन साधणे आवश्यकतेनुसार पुरवावीत.
आशा यांनी कोमॅार्बिड सर्वेक्षण काम नियमितपणे करावे. उपकेंद्रातील डॅाक्टर यांनी आशा यांच्या कामाची नियमीत तपासणी करावी. ग्रामस्तरीयसमितीने दररोज सकाळी किंवा संध्याकाळी गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा व आशा यांच्याकडून गृह विलगीकरण व कोमॅार्बिड सर्वेक्षणाच्या कामाची माहिती घ्यावी.
आशा सेविका यांना दररोज फक्त १०-१५ कोमॅार्बिड व्यक्तींची माहिती घ्यायची आहे, त्यामुळे फोनवर माहिती न घेता प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यावी. एखादा व्यक्ती जागेवर न आढळल्यास चुकीची माहिती भरु नये. गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक यांनी पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. टेस्टींग व विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास पोलीसांची मदत घ्यावी. हिंगणगाव, तरडगाव, गोखळी तांबवे, पाडेगाव, ढवळ, वाखरी, तिरकवाडी या गावांनी विलगीकरण कक्ष अतिशय चांगले केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या गावांचे भेटीदरम्यान कौतुक केले.
You must be logged in to post a comment.