सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा : किरकोळ वादातून शिरवळ (ता. खंडाळा) येथील एसटी बस स्थानकाच्या सुलभ प्रसाधनगृहात गळा दाबून व डोके आपटून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. रणजित गणपत जाधव (वय ४०, रा. बौद्ध वस्ती, शिरवळ) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शिरवळ बस स्थानकातील सुलभ प्रसाधनगृह चालवण्याचे काम रणजित करत होते. पोलिसांनी सांगितले, की शिरवळ एसटी बस स्थानकावर काल (गुरुवारी) रात्री अज्ञाताने रणजित जाधव यांचा गळा दाबून, जमिनीवर डोके आपटले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूकडून रक्त आले असल्याचे दिसते. ही घटना आज सकाळी उघडीस आल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. साताऱ्याहून ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली. श्वान पथकाच्या मदतीनेही मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून व श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडून काही धागेदोरे हाती लागतील का, याची चाचपणी शिरवळ पोलिस करत आहे.