शशिकांत शिंदे उतरले फिल्डवर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव, सातारा, खटाव भागातील आरोग्य सुविधेकडे लक्ष ठेऊन आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देत आहेत. कोरोना काळात लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी ते झटत आहेत. लोकांची हॉस्पिटलची वाढीव बिले, औषध पुरवठा संदर्भातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आ. शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे.

आमदार शशिकांत शिंदे यानी वडूथ उपकेंद्र व क्षेत्र माहुली येथे होणाऱ्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरला भेट दिली. या कोव्हीड सेंटर मध्ये सर्व उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. येथील अडचणी समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला. अंगापूर, क्षेत्र माहुली व वडूथ येथे उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड सेंटरसाठी व उभारलेल्या पुसेगाव डिसीसी साठी नुकताच ५० लाख निधी मंजूर करून देण्यात आला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येथे लागणाऱ्या आरोग्य सुविधा व यंत्रणा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.

कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, त्याच पार्श्वभूमीवर या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था स्वनिधीतून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. एकंबे येथे ५००, बिचुकले येथे शंभर आणि नलवडेवाडी (बिचुकले) येथील ५० कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था केली असून, या साहित्याचे वितरण आज पंचायत समितीमध्ये ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, रमेश उबाळे, डॉ. गणेश होळ, डॉ. नितीन सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती

error: Content is protected !!