साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’ विरोधात शिवसेना आक्रमक

ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवू नका; अन्यथा आंदोलनाचा इशारा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यात खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आक्रमक झाली आहे. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी वीज वितरण कंपनीला तीव्र शब्दांत इशारा दिला. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवले गेले, तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

कृष्णा नगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शेतकरी सेना प्रमुख प्रताप जाधव, तालुका प्रमुख रमेश बोराटे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे, तालुका संघटक प्रणव सावंत, खटाव तालुका प्रमुख संजय नांगरे, शहर प्रमुख गणेश अहिवळे, युवा सेना शहरप्रमुख ॲड. शिवेंद्र ताटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यात खासगी कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहेत. यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे मीटर कोणत्या निकषांवर बसवले जात आहेत, याची माहितीच दिली जात नाही. ही प्रक्रिया थांबवावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वीज वितरण कंपनी जबाबदार असेल.

तसेच, येत्या दहा दिवसांत या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेची चौकशी करून ती तत्काळ थांबवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!