शिवसेनेचा पोलिसांना निवेदनाद्वारे रोखठोक सवाल

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर व परिसरात दिवसेंदिवस बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका, जुगार, चक्री, अवैध दारू विक्री यांसारख्या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने थेट धाड टाकू, असा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रमुख तुषार दोषी यांना सादर करण्यात आले.
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे बिनधास्तपणे फोफावत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या धंद्यांमुळे तरुण पिढी झटपट पैसे मिळवण्याच्या नादात भरकटत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायांना पोलीस खात्यातील काही कर्मचाऱ्यांचेही मूक समर्थन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास पक्षाच्या पद्धतीने थेट कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जेथे अवैध धंदे आढळून येतील, तेथे केवळ गुन्हेगारच नव्हे तर संबंधित पोलीस अंमलदारांवरही कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा वैद्यकीय प्रमुख दीपक चव्हाण, शहर संघटक अमोल इंगवले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख शुभम भिसे, अजिंक्य रजपूत, अनिकेत भिसे, प्रथमेश बाबर, तेजस जाधव यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस प्रमुख तुषार दोषी यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून, शहरातील अवैध धंद्यांविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन दिले.

You must be logged in to post a comment.