सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या जागेत ई- बससाठीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज विरोध करत एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवला. हे चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या जागेत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कास परिसरात होणारे वाहनांचे प्रदुषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) पाच ई बसेस आणल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून पर्यटकांना कास परिसरात पर्यटनासाठी जाता येणार आहे. या बससाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संग्रहालयाचा प्रश्न सुटलेला नाही.
त्यामुळे हे संग्रहालय सुरू झालेले नाही. कोरोना काळात संग्रहालयात जंम्बो कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हजारो रूग्णांवर उपचार झाल्याने त्यांचे जीव वाचले. आता कोरोना संसर्ग संपल्यानंतर पुन्हा हे संग्रहालय सुरू करावे, तसेच त्याचे पुरातत्व विभागाकडे हस्तांतरण करून अंतर्गत सजावट करावी, अशी सातारकरांसह शिवसेनेची मागणी आहे.
पण, आता या परिसरातच जिल्हा प्रशासनाने हे चार्जिंग स्टेशन सुरू केल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तेथे जाऊन आंदोलन केले. तसेच या चार्जिंग स्टेशनला विरोध करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या चार्जिंग स्टेशनमुळे धोका होण्याची शक्यता असल्याने ते एसटी महामंडळाच्या जागेत करावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच ई बसला व चार्जिंग स्टेशनला आमचा विरोध नाही. पण चार्जिंग स्टेशन हे महामंडळाच्या जागेत उभारावे, संग्रहालयाच्या जागेत उभे राहू नये, अशी आमची मागणी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात शिवसेना सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे, प्रणव सावंत, सागर धोत्रे, सादिक भगवान तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.