महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रसिंहराजेंकडून ५ लाखांचे बक्षीस जाहीर

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब आणि गदा पटकावलेल्या १९ वर्षीय पृथ्वीराज पाटीलला स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांकडून १ रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत व्यक्त करणारा पृथ्वीराज पाटीलचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने ५ लाख रुपये जाहीर केली आहेत.

या संदर्भात बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हवे होते. मात्र, तसे घडले नाही. याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे, हे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही.

मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्ह्यातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरी विजेत्यालाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना ५ लाख रुपयांची रोख रक्कम बक्षिस म्हणून जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!