भिडे यांचे वक्तव्य अयोग्य : आ.शिवेंद्रसिंहराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संभाजी भिडे यांनी तसे बोलणे चुकीचे आहे. कोरोना हा व्हायरस असून, तो कोणालाही होऊ शकतो. मात्र, त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. शेवटी कोण शूर आहे आणि कोण … आहे, हे त्या व्हायरसला माहीत नसते. आताच्या परिस्थितीत अशी वक्तव्ये करणे पूर्णत: चुकीचे आहे. कोरोना सर्वसामान्यांनाही होतो आहे आणि पैसेवाल्यांनाही होत आहे. यामध्ये अनेक जण दगावले आहेत. त्यामुळे कोरोनाबरोबर कोणी खेळ करू नये., असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

भिडे यांनी सांगली येथे बोलतांना मुळात कोरोना हा रोग नाही आणि ज्यांना कोरोना होतो ती माणसे जगायच्या लायकीची नाहीत. तो फक्त … प्रवृत्तीच्या लोकांनाच होतो. तो एक मानसिक आजार आहे, असे वक्तव्य केले होते.यासंदर्भात शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,  राज्य सरकार कोरोना महामारीत अपयशी ठरले आहे का, या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलणे टाळत कोरोना महामारीचा वेग कमी झाल्यानंतर सरकारने थोडी तयारी करून ठेवायला हवी होती, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “दुसरी लाट येणार याची कोणाला कल्पना नव्हती. मात्र, सरकारने बेड, रेमडेसिव्हिर आदींची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडीफार ढिलाई झाली.”

लॉकडाउनबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “दोन दिवसांचा लॉकडाउन आम्ही तंतोतंत पाळू. कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ नये, म्हणून आम्ही आवश्यक ती काळजी घेत आहे. मात्र, काहीगोष्टींचा विचार करायला हवा. सरसकट तीन आठवडे लॉकडाउन नसावा, अशी माझी भूमिका आहे. जिल्हा प्रशासन स्वत:हून काही निर्णय घेत नाही. राज्य सरकार सूचना करत आहे, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आम्ही सहकार्य करत आहे. मात्र, तडकाफडकी निर्णय घेऊ नये.”

error: Content is protected !!