उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खासदार उदयनराजेंनी घोषणा करूनही फेरीवाल्यांना पालिकेकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही याचे आश्चर्य आहे. आत्ता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर, लॉकडाऊन संपून पुन्हा कधी हॉकर्सचा व्यवसाय सुरु होईल आणि तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील, तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये कन्सीशन देऊ, अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी, असा टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी सातारा नगरपालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी केली होती. या घोषणेला आता दीड महिना उलटला असून उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले या एक हजार रुपयांच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहेत. खा. उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार? का ही घोषणाही हवेत विरणार आहे, सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. चालू घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खा. उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती. खा. उदयनराजेंच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते. गेले महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु असून हातावर पोट असणाऱया फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची, वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरु आहे. मात्र अद्यापही खा. उदयनाराजेंनी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही.

error: Content is protected !!