जावली तालुक्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे ओढ्याना आलेल्या पुरात वाहून गेलेल्या जावली तालुक्यातील रेंगडीवाडी येथील ४ तर वाटंबे येथील एका मृताच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदतनिधी आज देण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, ज्ञानदेव रांजणे, सागर धनवडे, सुभाष शेलार यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, सरपंच उपस्थित होते. 


अतिवृष्टीमुळे ओढ्याला अचानक पूर आल्याने रेंगडीवाडीतील चारजण वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एकाच कुटुंबातील सहदेव गणपत कासुर्डे, भागाबाई सहदेव कासुर्डे आणि रविंद्र सहदेव कासुर्डे या तिघांसह तानाबाई किसन कासुर्डे यांचा मृत्यू झाला होता. तसेच महाबळेश्वर येथून कामावरून घरी परताना दरड अंगावर पडून पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या वाटंबे येथील जयवंत केशव कांबळे यांचा मृत्यू झाला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देऊ असे सांगितले होते. तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही तशा सूचना केल्या होत्या. 

मुख्यमंत्री सहायता निधी मधून १ लाख आणि महसूल विभागाकडून ४ लाख सानुग्रह अनुदान असा प्रत्येकी पाच लाख रुपये मदतनिधी मंजूर झाला. मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन मदतीच्या धनादेशाचे वाटप आज करण्यात आले.

error: Content is protected !!