सातारा तालुक्यातील सातबार्‍यावरील हस्तांतर बंदी शेरे अखेर उठवले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा तालुक्यातील उरमोडी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेंद्रे, अंबवडे खुर्द आणि नागठाणे या महसुल मंडलातील ४० गावातील शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर हस्तांतर हक्कामध्ये पुनर्वसन हस्तांतर बंदी शेरे नमुद होते. त्यामुळे या ४० गावातील शेतकर्‍यांना सदर जमिनी तारण, गहाण, दान, बक्षिस, विक्री, हक्कसोडपत्र आदी व्यवहार करण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. शेतकर्‍यांची गैरसोय आणि त्रास टाळण्यासाठी या ४० गावातील स्लॅबपात्र नसलेल्या खातेदार शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील पुनर्वसन हस्तांतरण बंदी शेरे गेले आहेत. 

उरमोडी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेंद्रे, नागठाणे आणि अंबवडे खुर्द या तीन महसूल मंडलातील ४० गावातील जमीनीच्या सातबारा उतार्‍यांवर शासनाने पुनर्वसन हस्तांतर बंदी शेरे मारले होते.  त्यामुळे या ४० गावातील शेतकर्‍यांना त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीचे तारण, गहाण, दान, बक्षिस, विक्री, हक्कसोडपत्र आदी महत्वाचे व्यवहार पुर्ण करण्यासाठी विनाकारण शासकीय कार्यालयामध्ये खेटे मारावे लागत होते. उरमोडी प्रकल्पग्रस्तांचे बहुतांशी पुनर्वसन झाले असून स्लॅबपात्र नसलेल्या म्हणजेच २ हेक्टर ४२ आर पेक्षा कमी जमीन असलेल्या खातेदार शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील इतर हक्कातील पुनर्वसन हस्तांतरण बंदी शेरे उठवणे आवश्यक होते. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरु केला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. 

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून नागठाणे, शेंद्रे, अंबवडे सर्कल मधील ४० गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवण्यात आले आहेत. नागठाणे सर्कल मधील नागठाणे, सोनापूर, रामकृष्णनगर, अतीत, गणेशवाडी, निनाम, शेंद्रे सर्कलमधील शेंद्रे, वळसे, वेचले, डोळेगाव, मुगदल भटाची वाडी, सोनगाव, शेळकेवाडी, भाटमरळी, कुमठे, शेरेवाडी आणि अंबवडे सर्कल मधील कुरुण, झरेवाडी, भोंडवडे, आंबवडे बु., डबेवाडी, शहापूर, जकातवाडी, पोगरवाडी, गजवडी, आरे, दरे, उपळी आदी गावातील जमिनीवरचे शिक्के उठवण्यात आले असून उर्वरित गावात ही प्रक्रिया वेगाने सुरु आहे. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल या ४० गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.    

error: Content is protected !!