महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी ; शिवेंद्रराजेंचे गडकरींना निवेदन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा ते पुणे महामार्गाची (एन.एच.४) अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारे आहे. अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि सातारा जिल्हावासियांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली.


ना. गडकरी कराड दौऱ्यावर आले असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि  महामार्ग दुरुस्तीसंदर्भात खड्ड्यांच्या छायाचित्रांसहित लेखी निवेदन देऊन चर्चा केली. सातारा ते पुणे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले असून वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट काम झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच महामार्गाची आणि सेवा रस्त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था, दुर्दशा झालेली आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधीत ठेकेदार यांना अनेकदा सुचना करुनही कोणतीही कार्यवाही होत नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले आहेत.   

महामार्ग व सेवा रस्त्यांची दुरावस्था तसेच महामार्गावर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसताना टोल वसुली मात्र सक्तीने केली जाते. याशिवाय टोल नाक्यावर प्रशासकीय अधिकारी, आजीमाजी सैनिक आणि नागरिकांशी नेहमीच उध्दट वर्तन करुन शिविगाळ दमदाटी करण्याचे प्रकार होत असतात. आनेवाडी टोलनाक्यावर मोठा भ्रष्टाचार झाला असून हे सर्व गैरप्रकार थांबवणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात कुठेही जायचे असेल किंवा पुणे, मुंबईला जायचे असेल तर महामार्गावर यावेच लागते पण, महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दररोज अनेक छोटेमोठे अपघात घडत असून अनेकजण जायबंदी होतात तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

error: Content is protected !!