सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योती आणण्याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्यांवर विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवज्योत आणण्यासाठी गर्दी केली होती. मंडळांचे कार्यकर्ते शिवज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ झाले.सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी प्रतिमापूजन, जन्मकाळ, पोवाडा, शिवचरित्रावर व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील चौका-चौकात भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडेही लावण्यात आले होते.
शिवजयंतीचे औचित्य साधून साताºयातील डॉ. शुभांगी गायकवाड यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. त्यांनी हाती शिवज्योत घेऊन राजगड ते अजिंक्यतारा ही १११ किलोमीटरची दौड पूर्ण केली. शुक्रवारी साताऱ्यात येताच त्यांचे शिवभक्तांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा पालिकेच्यावतीने सकाळी पालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लहूजी वस्ताद आदी महापुरुषांच्या पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सिता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे,, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त पालिकेकडून दरवर्षी शाही मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला. ऐतीहासिक गांधी मैदानावर पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या देखाव्याने सर्वांचेच लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना मावळ्यांनी ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष केला. या जयघोषाने शाहूनगरीत शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.
You must be logged in to post a comment.