पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत भाजप नेते गप्प का – शिवराज मोरे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्या कराडातील भाजप नेत्यांनी शेतीपंपाच्या वीज दराविरोेधात मूक माेर्चा मोर्चा काढला; मात्र तेच नेते गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत मूग गिळून गप्प आहेत. असे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांनी पेट्रोल-डिझेलसह गॅस दरवाढीच्या विरोधात धमक दाखवून सामान्यांची बाजू उचलावी आणि मगच आंदोलन करावे,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.            

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशात पेट्रोल-डिझेलने १०० रुपयांची पातळी पार केलेली आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढली असून, सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे न परवडणारी झाली आहेत. आधीच केंद्र सरकारचे शेतीबाबत चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे, हमीभाव बाबत कोणतेही ठोस धोरण केंद्रातील मोदी सरकार ठरवत नाही. आणि आता डिझेल दरवाढीमुळे शेतीची कामे सुद्धा महागली आहेत. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्या भाजप नेत्यांनी इंधनाच्या वाढत्या दराबाबत सुद्धा तोंड उघडावे.            

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोलचे दर भारतात वाढतच आहेत. ही केंद्र सरकारची दरवाढ नसून करवाढ आहे. त्यामानाने शेजारील बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशात पेट्रोलचे दर ८० रुपयांच्या आतच आहेत. आज पुन्हा एकदा गॅस दरवाढ २५ रुपयांनी झाली आहे. आधीच गॅसवरील सबसिडी मोदी सरकारने बंद केली आहे, त्यामध्ये ही वारंवार होत असलेली दरवाढ याबाबत भाजप नेते बोलणार आहेत का नाही? सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार वारंवार करीत आहे. यासाठी काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न मांडत आहे. परंतु याबाबत कोणतीही कणव न घेणारे भाजप नेते मूग गिळून गप्प आहेत. त्यांना एवढाच जनतेचा, शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी इंधन दरवाढ विरोधात केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारावा.

error: Content is protected !!