सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या दुसर्या लाटेत आमदार महेश शिंदे हे पुन्हा एकदा कार्यरत झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या १२२ बेड्सच्या काडसिध्द कोविड हॉस्पिटलनंतर आता वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन पुन्हा एकदा रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात नवीन शंभर बेड्सचे सुसज्ज आणि सर्वाधिक ९० ऑक्सिजन बेड्सचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या या हॉस्पिटलचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच नवीन कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी स्वखर्चाने रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात काडसिध्द कोविड हॉस्पिटल उभे केले होते. राज्यात स्वखर्चाने पहिले सुसज्ज कोविड हॉस्पिटल अल्पावधीत उभारणारे ते पहिले आमदार आहेत. व्हेंटीलेटर बेड्सची संख्या अगदी नगण्य असल्याने त्यांनी आयसीयुसह व्हेंटीलेटर बेड्सची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ३० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करुन, त्यांच्यावर उपचार केले. त्याचबरोबर १४३० रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार करुन त्यांना विनाशुल्क सहीसलामत घरी परतले आहेत. मतदारसंघातील जे रुग्ण अत्यवस्थ होते, त्यांच्या उपचाराची व्यवस्था पुणे मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये आमदार महेश शिंदे यांनी केली होती.
कोरोना काळात कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांना नाष्टासह जेवणाची व्यवस्था देखील आमदार महेश शिंदे यांच्यामार्फतच करण्यात आली होती. तसेच कोरोना काळात व्यवसाय बंद राहिल्याने समाजातील सर्वच घटकांना आर्थिक व जीवनावश्यक साहित्यरुपी मदत देखील करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेची भीषणता लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर काडसिध्द कोविड हॉस्पिटलची कमीत कमी कालावधीत उभारणी केली आहे. सद्यस्थितीत तेथे १२२हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून, तेथे ऑक्सिजनयुक्त बेड्सची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर परदेशातून आयात करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटरचा वापर केला जात आहे.
मतदारसंघातील तीन्ही तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असल्याने आमदार महेश शिंदे यांनी तातडीने पुन्हा एकदा रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात नवीन शंभर बेड्सचे सुसज्ज आणि सर्वाधिक ऑक्सिजन बेड्सचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे काम दिवसरात्र युध्दपातळीवर सुरु आहे. शंभर बेड्सचे सुसज्ज आणि
सर्वाधिक ९० ऑक्सिजन बेड्सचे कोविड हॉस्पिटल तयार केले जात असून,नजिकच्या काळात ते सुरु केले जाणार आहे. कोरेगाव शहरातील सर्वच खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील आता मोफत जेवण दिले जाणार असून, रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.