सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी (वय ४१, सध्या रा. फलटण, मूळ सांगली) याला तेरा लाखांचे बील पुढील कार्यालयात मंजुरीला पाठविण्यासाठी ३९ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, ३९ वर्षीय तक्रारदार यांनी वीज वितरण कंपनीमध्ये १३ लाखांचे काम केले होते. या कामाचे बील मंजुरीला पुढच्या कार्यालयात पाठविण्यासाठी कार्यकारी अभियंता मंदार वग्याणी याने त्यांच्याकडे तीन टक्क्यांप्रमाणे ३९ हजार मागितले. याप्रकारानंतर तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपतच्या कार्यालयात धाव घेऊन रितसर तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता वग्याणी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मंगळवारी दुपारी फलटणमधील वीज वितरणच्या कार्यालयातच वाग्याणी याला ३९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाइक विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, मारूती अडागळे यांनी या कारवाइत भाग घेतला.
You must be logged in to post a comment.