पोलीस प्रशासन हतबल; खा.उदयनराजेंनी दूरध्वनीवरून काढली समजूत
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळात छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश करून सन्मानाने महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाण्यात कार्यरत होमगार्ड सदाशिव ढाकणे (वय ४०, रा. चांदई एक्को, ता.भोकरदन) या कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राजूर-टेंभुर्णी रोडवर असलेल्या एका मोबाईल टॉवरवर जाऊन आत्महत्येची धमकी देत ‘शोले स्टाईल’ स्टंट केला. दरम्यान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी ढाकणे याच्याशी मोबाईलवरून संवाद साधत समजूत काढली व त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले.मात्र या प्रकाराची संपूर्ण राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाण्यात सर्व होमगार्ड यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे होमगार्ड सदाशिव ढाकणे हे बुधवारी सकाळी हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूर येथे कर्तव्यावर असताना अचानक राजूर-टेभूर्णी रोडवर असलेल्या एका ‘मोबाईल टॉवर’वर चढून त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी केली. त्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच डीवायएसपी डॉ. गणपत दराडे, प्रभारी सहायक पाेलिस निरिक्षक सचिन खामगळ, पोलिस उपनिरिक्षक अर्चना भोसले, तलाठी विजग गरड, जमादार सुभाष डोईफोडे, रामेश्वर शिनकर, राहूल भागिले यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
मोबाईल टॉवर वरून होमगार्ड ढाकणे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करून समाजाला नवी दिशा दिली. बलाढ्य शत्रूंशी लढा देऊन त्यांनी निर्माण केलेले शिवस्वराज्य समाजाच्या सर्व स्तरातील घटकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या घराण्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना राजकारणात आदराचे स्थान द्यावे व मंत्रीपद देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महायुतीतील जबाबदार नेतेमंडळी शिवेंद्रराजेंना सन्मानाचे मंत्रीपद देत नाहीत आणि दोन तासात याबाबतची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.आपण आत्महत्या करणार आहोत, अशी धमकी दिली.
यावेळी जमिनीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे संबंधित व्यक्तीला पोलीस प्रशासनाकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता.मात्र ढाकणे कोणाचेही ऐकत नसल्याने नेमके काय करावे हे कोणाला सुचत नव्हते. त्यावेळी जालना पोलिसांनी शिवरायांचे थेट वारसदार लोकसभा सदस्य खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना सदरच्या घटनेची माहिती देऊन आपण संबंधित व्यक्तीशी बोलावे अशी विनंती केली. उदयनराजेंनी तत्काळ मोबाईलवरून संपर्क साधत संबंधित युवकाची समजूत काढली. मात्र “मी माझ्या होमगार्ड खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आहे. मला कशाचीही परवा नाही. संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील मान्यवरांना मंत्रिपद द्यावे हाच आपला एकमेव ध्यास आहे. तशी घोषणा नेतेमंडळींनी करण्यासाठी आपण उंचावरून उडी मारणार आहोत ” असे श्री. छ. उदयनराजे यांना संबंधित युवकाने मोबाईलवर बोलताना सांगितले.
दरम्यान ‘जीवन हे अनमोल आहे. तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या समर्थनासाठी आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे. काय व्हायचे ते नियमानुसार होईलच. मला भेटण्यास सातारला या.” अशा शब्दात ढाकणेची खा.उदयनराजे यांनी समजूत काढली. त्यावर संबंधित युवकाने “महाराज, मी तुमचा मावळा आहे. तुम्ही सांगता म्हणून मी टॉवरवरून खाली उतरतो आणि आत्महत्येचा विचार सोडून देतो. तुम्हाला भेटण्यास आणि मुजरा करण्यास मी अवश्य सातारला येईन,” असे फोनवरून सांगितले. यावेळी संबंधित होमगार्ड उंच मोबाईल टॉवर वरून खाली आल्यावर सर्वांनीच समाधान व्यक्त केले.
दरम्यान, खा.उदयनराजेंच्या फोनमुळे एका शिवनिष्ठ मावळ्याचा प्राण वाचला, अशी प्रतिक्रियाही सर्वत्र व्यक्त होत आहे.
You must be logged in to post a comment.