खंडाळा तालुक्यात प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खंडाळा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): खंडाळा तालुक्यातील पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या २५ वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला नाही? खंडाळा तालुक्याचा फक्त मतांपुरता वापर करणाऱ्या या निष्क्रिय आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केले आहे.
वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रचार दौऱ्यानंतर ‘होम पीच’ असलेल्या खंडाळा तालुक्यात सुरू असलेल्या श्री. जाधव यांच्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
श्री.जाधव म्हणाले की, वडील दहा वर्ष खासदार, जिल्हा बँक, जिल्हा परिषद व साखर कारखान्याची सत्ता ही यांच्याच घरी होती. हे स्वतः १५ वर्ष आमदार आहेत. सुमारे ४० वर्षे सत्ता यांच्याच घरात असूनही यांना वाई तालुक्यातील योजनादेखील पूर्ण करता आली नाही. वाई शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही. ज्या किसन वीर आबांच्या नावाने राजकारण करताहेत, त्यांचे स्मारकही अद्याप धुळखात पडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर यांना खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याची आठवण झालीय. पाण्याचा एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी वल्गना हे करत आहेत, मग पंधरा वर्षे यांनी नेमके काय केले? असा थेट सवाल पुरुषोत्तम जाधव यांनी केला.
तालुक्यातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने पारगाव-खंडाळा, बावडा, भादवडे, शिवाजीनगर, मोर्वे, अहिरे सुखेड- बोरी, खेड, लोणंद, कोपर्डे, पाडळी, धावडवाडी, घटदरे, हरळी या गावात जाऊन श्री. जाधव यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व परिवर्तनात सहभागी होण्याचं आवाहन केले.
खंडाळा भूमिपुत्रालाच साथ देणार
राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाच्या वाई मतदारसंघात खंडाळा तालुक्यातील मतदान हे नेहमीच निर्णायक ठरत असते. खंडाळा तालुकाच या मतदारसंघाचा आमदार ठरवतो. मी इथला भूमिपुत्र आहे. प्रस्थापितांना टक्कर देणारा ठोस पर्याय म्हणून मी लढत देत आहे. सर्वसामान्य जनतेनेच माझी निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचार दौऱ्यात सांगितले.
You must be logged in to post a comment.