सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संत गाडगे महाराजांनी स्वत: स्थापन केलेल्या श्री गाडगे महाराज मिशनमार्फत दि.१ व २ ऑगस्ट रोजी चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करण्यात आले.
चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने भयानक परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले.अशा आपत्कालीन परिस्थितीत गाडगे बाबांनी स्थापन केलेल्या मिशनचंही मदतकार्य पोहोचायला हवं, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्याठिकाणी मदत करण्याचं ठरलं. संस्थेचे पदाधिकारी, संचालक यांनी त्याकरिता आवश्यक ते सारं नियोजन व पूर्वतयारी करून दि. ३० रोजी सायंकाळी मिशन परिवारातील सर्वांना स्वेच्छेने मदतीचं व सहभागाचं आवाहन केलं आणि त्या आवाहनाला संवेदनशील मनाने आणि विश्वासाने प्रतिसाद देत संस्था परिवारातील सर्वांनी भरघोस अशी मदत केली.
दोन दिवसांत ३ लाखांच्या वर निधी जमा झाला व मदतकार्यात सहभागासाठी ५५ कार्यकर्ते सज्ज होऊन दि. १ रोजी सकाळी चिपळूण येथे दाखल झाले. दोन दिवस त्या ठिकाणी आलेल्या सर्वांनीच देहभान विसरून काम केलं. यावेळी पदाधिकाऱ्यांना श्रमदानासह पुरग्रस्तांना आटा, तांदूळ, तुरडाळ, साखर, मीठ, तिखट, हळद, मसाला, आंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण, साडी, ब्लॅंकेट, टॉवेल इ. वस्तूंचे बॉक्स तयार करून वाटप केले.
संत गाडगेबाबांनी आयुष्यभर दुःखीतांचे दुःख निवारण करण्याचे काम केले. बाबांच्या संदेशास अनुसरून हे काम पुढं चालू रहावं या उद्देशाने संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत केलेली मदत महत्वपूर्ण आहेच पण त्याचबरोबर या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन दिलेलं योगदानही बहुमोल आहे. याबद्दल सर्वांचे आभार कसे मानावेत हेच समजत नाही. आभाराला शब्द कमी पडावेत असं काम या सर्वांनी करून दाखवलं याचा मला अभिमान वाटतो. निश्चितच याबद्दल मी सर्वांचा कृतघ्न आहे. पुढील काळात देखील अशाच पद्धतीचं आपलं काम करून बाबांचं हे सेवेचं व्रत पुढे चालवण्याचा संकल्प भविष्यातही सुरूच राहील.– मधुसूदन मोहीते-पाटील
चेअरमन, श्री गाडगे महाराज मिशन, चिपळूण.
या प्रलयामुळे चिपळुणसह इतर पुरग्रस्त भागातील परीस्थिती अतिशय भयावह आहे, लोकांनीसुध्दा आता स्वयंस्फुर्तीने पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घ्यायला पाहीजे. गाडगे महाराज मिशनमार्फत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला याच पध्दतीने गाडगे महाराजांच्या विचारांवर मिशनचे हे काम अविरत पुढे चालू राहील.– सचिन राजारामबाप्पू घोंगटे, सचिव, श्री गाडगे महाराज मिशन ,चिपळूण.
You must be logged in to post a comment.