पुणे-बेंगलोर महामार्गासाठी ५५८ कोटी २४ लाख निधी मंजूर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीनंतर खासदार श्रीनिवास पाटील व उदयनराजे भोसले यांनी कामाचा धडाका लावला आहे. दोघांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी  पत्रव्‍यवहार करुन तर अनेकदा त्यांना प्रत्‍यक्ष भेटून सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती क्षेत्राच्या सुधारणा व दुरुस्तीसाठी ५५८ कोटी २४ लाख निधी मंजूर केला आहे. त्यापैकी मलकापूर शहरातील तीन किलोमीटर नव्या उड्डाणपूलासाठी ४५९ कोटी ५२ लाखाचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

कागल  ते शेंद्रे महामार्गाच्‍या पट्यातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल ६४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍ह्यातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी ४५९ कोटी ५२ लाख रुपये निधी मंजुर झाला आहे. मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी ४७ कोटी १८ लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी ४५ कोटी ३५ लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी ६ कोटी १९ लाख  निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी शेंद्रे ते कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे.    

शेंद्रे ते कागल अशा १३२ कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वहातूकीसाठी निर्माण होत असलेली धोकादायक परिस्थिती तसेच या पटृयात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याकडे उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या बजेट अधिवेशनातील  प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात खासदार पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत महामार्ग संदर्भातील आपल्या मागण्या केल्या होत्या. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देवून मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडकरी यांचे उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले आहेत. 

error: Content is protected !!