बनकर आणि खानविलकरांकडून मला बदनाम करण्याचे कारस्थान : सिध्दी पवार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक उद्यान साकार करणे व स्विमिंग पूल उभारण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी मी निधीदेखील खेचून आणला परंतु हा निधी इतर कामांना वळविण्यात आला. अनेकदा तगादा लावूनही माझी कामे मार्गी लागली नाहीत. चार साडेचार वर्षात अतिशय मानसिक त्रासाला मला सामोरे जावे लागले. कारण बनकर आणि खानविलकर यांनीच माझी कामे अडवली. त्यांच्यामुळेच मला प्रचंड मानसिक त्रास झाला. मी ऐकत नाही म्हणून माझ्यावर नको ते आरोप केले जातात. माझ्यावर केस टाकण्यासाठी माणसं तयार केली जातात. हे प्रयत्न जर त्यांनी विकासासाठी केले असते तर आज विकासाला कोणी आडव गेलं नसतं, असा आरोप भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी केला.

बांधकाम ठेकेदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने नगरसेविका सिद्धी पवार यांच्यावर टीकेची झोड उठत असतानाच त्यांनी शनिवारी एका ऑडिओ क्लिपद्वारे सातारा पालिकेतील राजकारणाची अक्षरश: पोलखोल केली. त्या म्हणाल्या, खासदार उदयनराजे भोसले हे कायमच आदरस्थानी राहिलेले आहेत. त्यांनीच मला सभापती पदाची संधी दिली. मात्र पद मिळाल्यापासून मी अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचे राजकारण पाहत आले आहे. महाराजांच्या अवती भवती दोन जादूगार असे आहेत की जे कधीही कोणतेही टेंडर बदलतात, या जादूगारांना काहीही करता येतं. हे जादूगार दिसत नाहीत; परंतु ते अचानक कुठेतरी प्रकट होतात. त्यांचा कायमच सर्वांवर दबाव असतो.

खासदार उदयनराजे भोसले यांची मी सर्वप्रथम माफी मागते. मी दोनच महिन्यांपूर्वी त्यांना सभापतिपदाचे राजीनामा पत्र सादर केले आहे. त्या वेळी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून आपण सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते; परंतु तसे झाले नाही. जे राजकारण मी नगरसेवक म्हणून पाहत होते ते वेगळं आणि सभापतीपद मिळाल्यानंतर जे राजकारण मी पाहिलं ते अत्यंत भयानक होते. कारण माझ्यावर अदृश्य शक्तींकडून सतत दबाव आणला जात होता. खोलात जाऊन विचार केल्यानंतर समजलं की हे ‘दोन’ जादूगार आहेत. हे जादूगार टेंडर्स बदलतात. या जादूगारांना काहीही करता येतं. हे जादूगार दिसत नाहीत परंतु ते अचानक कुठेतरी प्रकट होतात. आम्ही ही जादू का आणि कशासाठी बघायची. या सगळ्या गोष्टी मी उदयनराजे भोसले यांना पत्राद्वारे कळविल्या. हे जेव्हा जादूगारांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी जादूचे खेळ सुरू केले.

error: Content is protected !!