सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी झेंडा दाखवून केले. सातारकरांनी धावणाऱ्या स्पर्धकांना टाळ्या, ढोल, वाद्य वाजवून प्रोत्साहन दिले. 7 हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ऊन आणि आल्हाददायक वारा अंगावर झेलत सर्व स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद लुटला.
या स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिझॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त होईल.ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी,औषधे, बिस्कीटं, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. जर त्यातून एखाद्या स्पर्धकाला जास्तच त्रास झालाच तर स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे अशा स्पर्धकाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल. साताऱ्यातील काही हॉस्पिटलमध्ये अशा बेड्स राखून ठेवल्या आहेत.
या स्पर्धेमुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले असून स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे व त्यातून सर्व सातारकर नागरिक एक झाले असून त्यामुळे सातारा शहराचे वैभव वाढून पर्यटनाला चालना मिळेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेची खास बाब म्हणजे सन २०१२ साली झालेल्या पहिल्या वर्षी या अर्धमॅरेथॉन स्पर्धेमध्ये केवळ १२ सातारकर सहभागी झाले होते. यावर्षी सातारकरांनी ३००० चा पल्ला पार केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये महिलादेखील उस्फूर्तपणे व तेवढ्याच तयारीने स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून साताऱ्याची नवी ओळख करून दिली आहे.
निसर्गरम्य डोंगररस्त्यावर जाणाऱ्या या स्पर्धेचा सुंदर असा मार्ग यामुळे ही स्पर्धा जगभरातील सर्व स्पर्धकांच्या पसंतीला उतरली आहे. सातारच्या लौकिकाला उंचावर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर धावताना स्पर्धकांना चिअरिंग टीम प्रोत्साहन देत आहेत. ढोल ताशा, लेझीम पथक तसेच पारंपरिक वाद्य वाजवून स्पर्धकांचा उत्साह वाढविला जात आहे. रस्त्याच्या दुतर्फ़ा उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले जात आहे. स्पर्धेत ७ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. तर स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.
सातारा पोलीस कवायत मैदान येथून सुरू झालेल्या 21 किलोमीटरच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये मध्यप्रदेश जबलपूर येथील लष्करातील जवान प्रल्हाद धनावत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महिलांमध्ये माणदेश एक्सप्रेस रेश्मा केवटे प्रथम. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील बेंदेवाडी या ठिकाणचे राहणारे असून त्यांनी 1 तास 9 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण करत स्वतःचे अगोदरचे 1 तास 12 मिनिटांचे रेकॉर्ड मोडले आहे. तर साताऱ्यातील मांढरदेव येथील कालिदास हिरवे याने दुसरे क्रमांक पटकावत 1 तास 12 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.
महिलांमध्ये माण येथील रेश्मा केवटे ही युवती प्रथम आली असून तिने ही 1 तास 24 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण करत अगोदरच 1 तास 32 मिनिटांचा विक्रम मोडला आहे.अतिशय अवघड अशी ही स्पर्धा मानली जात असून डोंगर आणि घाटातून भरवण्यात येणारी भारतातील ही एकमेव स्पर्धा आहे..
You must be logged in to post a comment.