कैलास स्मशानभूमीतील सहा अग्निकुंड पाण्याखाली

धोम – कण्हेर धरणांतून वाढीव विसर्ग; अंत्यसंस्काराआधी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व वेण्णा नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून, मंगळवारी या पुराचे पाणी कैलास स्मशानभूमीत शिरले. पाण्याखाली स्मशानभूमीतील तब्बल सहा अग्निकुंड पूर्णतः बुडाले आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, प्रशासनाने धोम आणि कण्हेर धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केला आहे. परिणामी कृष्णा व वेण्णा नद्यांची पातळी धोक्याच्या स्तरावर पोहोचली आहे. याच संगमाच्या खालच्या बाजूस असलेल्या कैलास स्मशानभूमीत पाणी घुसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

स्मशानभूमीतील खालच्या टप्प्यातील अग्निकुंड वापरास अयोग्य झाले असले, तरी वरच्या बाजूचे काही अग्निकुंड अद्याप अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध आहेत. मात्र, परिस्थितीतील अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्याआधी ९४२२६०३६२५/९६५७८१६११२ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!